‘लेझर शो’मुळे डोळ्यांना इजा होऊ शकते का? रेटिनाच्या मध्यावर हा लाइट पडला तर डोळा भाजतो
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2023 01:48 PM2023-10-11T13:48:46+5:302023-10-11T13:49:25+5:30
नेत्ररोगतज्ज्ञांच्या मते, लेझर शोच्या लाइटमुळे डोळ्यांना गंभीर इजा होऊ शकते. त्यासोबत रेटिनाच्या मध्यावर हा लाइट पडला तर डोळा भाजतो, त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
मुंबई : राज्यभरात गणपती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. मात्र, राज्यातील काही शहरांत मात्र विसर्जनाच्या दिवशी काही गणेशोत्सव मंडळांनी मोठ्या प्रमाणात डीजे आणि लेझर शो लावला होता. यामुळे या लेझर लाइटमुळे नाशिक आणि पुणे येथील काही युवकांच्या डोळ्यांमध्ये इजा झाली. या अशा घटनामुळे राज्यात खळबळ उडाली असून, लेझर शो करण्यास बंदी आणावी, अशी मागणी काही सामाजिक संस्थांनी केली आहे. नेत्ररोगतज्ज्ञांच्या मते, लेझर शोच्या लाइटमुळे डोळ्यांना गंभीर इजा होऊ शकते. त्यासोबत रेटिनाच्या मध्यावर हा लाइट पडला तर डोळा भाजतो, त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
डोळा हा शरीरातील सर्वांत नाजूक अवयव आहे. त्यामुळे तो इतका संवेदनशील असतो की त्यात अत्यंत बारीक धूळ जरी गेली तरी त्याचा त्रास होतो. लेझर शो उत्सवाच्या दिवशी लावणे हा ट्रेंड सध्या वाढत आहे. त्यामुळे अनेक मंडळांमध्ये लेझर शो कोणाचा चांगला यावरून स्पर्धा सुरू असते. त्यामुळे अनेक मोठमोठे लेझर शो करणारे या कार्यक्रमासाठी विविध जिल्ह्यांतून येत असतात. मुंबई, पुणे, नाशिकमध्ये असणाऱ्या लेझर शोचे लोण आता राज्यातील विविध तालुक्यांपर्यंत पोहोचले आहे.
हा शो उघड्या डोळ्यांनी पाहणे धोकादायक
अनेक वेळा उत्सवात नृत्य करताना कार्यकर्ते बेभान होऊन नाचत असतात. मात्र, या अशा आनंदाच्या प्रसंगी लावलेल्या लेझर लाइटचा आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो याची अनेकांना जाणीव नाही. त्यातून काही वेळा अनुचित प्रकार घडल्याचे दिसून येत आहे, तसेच लेसर शोच्या लाइटमुळेसुद्धा अनेकांच्या डोळ्यांना गंभीर इजा होत असते. त्यामुळे उघड्या डोळ्यांनी लेझर शो पाहू नये याकरिता वेगळ्या स्वरूपाचे चष्मे मिळतात, ते वापरले पाहिजेत.
तीव्र स्वरूपाच्या लेसर लाइटचा निश्चितच डोळ्यावर परिणाम होतो. कारण लेसर लाइट हा टार्गेटेड असतो. डोळ्यांमधील रेटिनाच्या मध्यावर हा लाइट पडला तर डोळा भाजतो. तेथे काळे डाग पडतात. नजर अंधुक होते किंवा दृष्टी जाते. तीव्र प्रकाशझोतामुळे रेटिनाच्या आजूबाजूला असणाऱ्या छोट्या रक्तवाहिन्या फुटतात. त्याला वैद्यकीय भाषेत हेमोरेज (रक्तस्राव होतो) म्हणतात. त्यामुळेसुद्धा दृष्टीवर परिणाम होऊन अंधुक दिसू शकते.
- डॉ. प्रीतम सामंत, हिंदुजा हॉस्पिटल
काय होऊ शकतो त्रास?
या लाइटमुळे डोळ्याच्या बाहेरच्या बाजूला त्रास होतो, तसेच यामुळे डोळ्यातून पाणी येणे, चुरचुरणे आणि डोळा लाल होणे. या अशावेळी नागरिक डोळा जोरजोराने चोळतात. त्यामुळे डोळ्यातील लेन्सवर याचा परिणाम होतो. तीव्र प्रकाशझोतामुळे रेटिनाच्या आजूबाजूला असणाऱ्या छोट्या रक्तवाहिन्या फुटतात. त्याला वैद्यकीय भाषेत हेमोरेज (रक्तस्राव होतो) म्हणतात.