Join us

आॅफलाइन प्रवेश घेणा-यांना परीक्षा देता येणार नाही, १७ महाविद्यालयांना कारणे दाखवा नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2017 4:45 AM

अकरावी प्रवेशात विद्यार्थ्यांची फसवणूक होऊ नये, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेनुसार त्यांना प्रवेश मिळावा, यासाठी शिक्षण उपसंचालक विभागाने गेल्या वर्षीपासून प्रवेशासाठी आॅनलाइन पद्धत लागू केली

मुंबई : अकरावी प्रवेशात विद्यार्थ्यांची फसवणूक होऊ नये, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेनुसार त्यांना प्रवेश मिळावा, यासाठी शिक्षण उपसंचालक विभागाने गेल्या वर्षीपासून प्रवेशासाठी आॅनलाइन पद्धत लागू केली. मात्र, मुंबई विभागातील तब्बल १७ महाविद्यालयांनी आॅफलाइन प्रवेश दिल्याची माहिती समोर आली. या महाविद्यालयांमध्ये १ हजार ५५ विद्यार्थ्यांनी आॅफलाइन प्रवेश घेतल्याने, त्यांना १२ वीच्या परीक्षेला बसण्यास परवानगी नाकारली आहे, तर विभागाने या १७ महाविद्यालयांना मान्यता का रद्द करण्यात येऊ नयेत, अशी कारणे दाखवा नोटीस पाठविली आहे.आॅनलाइन पद्धतीनेच प्रवेश देण्याचे आदेश असतानाही, विद्यार्थ्यांना आॅफलाइन प्रवेश देण्यात आले. यामध्ये सर्वाधिक प्रवेश हे विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना देण्यात आले आहेत. नामदार अजित पवार या महाविद्यालयात ५४४ विद्यार्थ्यांना आॅफलाइन प्रवेश देण्यात आले होते. त्यानंतर महाराष्ट्र कॉलेज आॅफ आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स या महाविद्यालयात १३५ विद्यार्थ्यांना आॅफलाइन प्रवेश देण्यात आले होते. अंधेरीच्या आर. सी. मारुती कनिष्ठ महाविद्यालयात ५७, एन. के. ई. एस. कनिष्ठ महाविद्यालयात ४३ आॅफलाइन प्रवेश दिले आहेत. अशा सर्व १७ महाविद्यालयांना नोटीस पाठविली आहे. विज्ञान शाखेसाठी ५४०, वाणिज्य शाखेसाठी ३८४ आणि कला शाखेत १३१ जागांवर आॅफलाइन प्रवेश दिले आहेत.आॅफलाइन प्रवेशाबाबत ७६ महाविद्यालयांना कारणे दाखवा नोटीस पाठविली होती. त्यापैकी ५९ महाविद्यालयांनी आॅफलाइन प्रवेश का दिले? याची उत्तरे पाठविली आहेत. त्यात तांत्रिक अडचणींमुळे प्रवेशाची आॅनलाइन नोंदणी केली नसल्याची माहिती दिली आहे. महाविद्यालयांना नोटीस पाठवल्यावर, काही महाविद्यालयांनी शिक्षण उपसंचालक विभागाला पत्राद्वारे नावे कळविल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे या महाविद्यालयांनी आॅफलाइन प्रवेश दिला नसल्याचे स्पष्ट झाले. पण या १७ महाविद्यालयांनी मात्र, आॅफलाइन प्रवेश दिल्याचे स्पष्ट झाले आहे.त्यामुळे या महाविद्यालयांना कारणे दाखवा नोटीस पाठविण्यात आली आहे. या महाविद्यालयांना आठ दिवसांची वेळ देण्यात आली आहे.

टॅग्स :विद्यार्थी