Join us

रेल्वे स्थानकात पाण्याची बाटली 15 रुपयांना मिळते का? काही ठिकाणी लूट होऊनही प्रशासनाचे दुर्लक्ष 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2023 3:46 PM

प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहत लूट करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला पाहिजे अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

मुंबई : वाढल्या उकाड्याने सतत तहान लागते. घराबाहेर पडल्यानंतर किंवा प्रवासादरम्यान पाण्याची थंड बाटली खरेदी केली जाते. बस, रेल्वे स्थानकावर पाणी बाटलीचे दर निश्चित आहेत. मात्र, या दरात वाढ केली जात असल्याचे चित्र दिसते. मुंबईत रेल्वे व बसस्थानकावर पाण्याची बाटली १५ रुपयांना मिळणे अपेक्षित असताना काही स्थानकात २० रुपयांना विकली जात आहे. ५ रुपयांची प्रवाशांकडून लूट होत असूनही कारवाई मात्र होताना दिसत नाही. अधिकृत परवानाधारक विक्रेत्यांना एमआरपीप्रमाणे पदार्थ विक्रीची परवानगी आहे. मात्र, पाणी बाटलीसाठी ५ रुपये अधिक घेतले जात असल्याने प्रवाशांत नाराजी आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहत लूट करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला पाहिजे अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

रेल नीर १५ रुपयांनाच- रेल्वेने प्रवाशांची आर्थिक लूट थांबावी आणि प्रवाशांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे. यासाठी रेल नीर आणि एसटीनेसुद्धा नाथ जल बाटलीबंद पाणी मिळण्याची सुविधा सुरू केली आहे. सुविधा प्रत्येक रेल्वे, बसस्थानकावर उपलब्ध आहे. या बाटलीची किंमत ही १५ रुपये असून, नागरिकांनी ती तितक्याच रुपयांना विकत घ्यावी.

बस स्थानकावर  - बसस्थानकावर नाथ जल ही पाण्याची बाटली मिळते; परंतु इतर कंपनीचे बाटलीबंद पाणी २० रुपयांना विक्री केले जात आहे. या बाटल्यांवरही १५ रुपये किंमत असल्याचे निदर्शनास आले आहे. काही प्रमाणात नाथ जल पाणी बाटली बाहेर ठेवलेल्या आहेत. मात्र, ते थंड करून प्रवाशांना देत नाहीत.

इतर बाटल्यांना पसंती- रेल्वे स्थानकावर नीर ही पाण्याची बाटली १५ रुपयांना विकली जाते. इतर कंपनीच्या बाटल्या २० रुपयांना विक्री होत आहे. रेल्वे स्थानकावर रेल्वे थांबल्याने गाडी निघण्याची घाई असते. अशा वेळी विक्रेते किती पैसे घेतात, हे प्रवासी पाहत नाहीत, याचा फायदा घेत १५ रुपयांची पाण्याची बाटली २० रुपयांना दिली जाते. 

रेल्वे स्थानकावर नागरिकांना रेल नीर ही पाण्याची बाटली १५ रुपयांनाच उपलब्ध करून दिली जाते; परंतु अनेकदा पाच रुपये सुटे नसल्याने नागरिक एकहून जास्त बॉटल खरेदी करतात. मात्र, रेल्वे गाड्यांमध्ये या बाटलीची २० रुपयांना विक्री केली जाते. केवळ पाण्याची बाटलीच नव्हे तर इतर पॅकिंग केलेल्या खाद्यपदार्थांचीही अतिरिक्त दराने विक्री केली जाते.-किरण मुंडे, प्रवासी

टॅग्स :रेल्वेपाणी