n मुंबई : कॅनडाच्या पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी राजपत्र असलेले गौरवपत्र वादळवाट या पुस्तकाच्या लेखिका आणि मराठी विश्वकोशाच्या माजी अध्यक्षा डॉ. विजया वाड आणि वादळवाट पुस्तकातील रमेश खानविलकर यांच्या व्यक्तिमत्त्वावर असल्याने त्यांच्या आई शारदा श्रीराम खानविलकर या दोघींचा मूळचे महाराष्ट्रीयन असलेले कॅनडातील उद्योगपती डॉ. विजय ढवळे यांच्यातर्फे लोकसभेचे माजी अध्यक्ष मनोहर जोशी यांच्या हस्ते एका कार्यक्रमात नुकताच सन्मान करण्यात आला. कॅनडाच्या पार्लमेंट हाऊसमध्ये आतापर्यंत फक्त चारच भारतीय लोकांचा सत्कार आणि सन्मान तेथील पंतप्रधानांनी केला आहे. त्यापैकी एक असलेले मनोहर जोशी म्हणाले की, कॅनडा देशाची राजमुद्रा असलेले गौरवपत्र डॉ. विजया वाड आणि शारदा खानविलकर यांना माझ्या हस्ते देताना कॅनडा सरकारने या दोन मातांबरोबर माझाही गौरव केला आहे. डॉ. विजय ढवळे यांच्यामुळे आज या दोन्ही महान विभूती मातांचा सत्कार करण्याचे भाग्य मला लाभले आहे. यावेळी रमेश खानविलकर हेही उपस्थित होते. यावेळी डॉ. विजय ढवळे म्हणाले की वादळवाट हे पुस्तक कॅनडातील मराठी माणसे समूहाने वाचतात. ही बाब मी कॅनडाच्या पंतप्रधानांच्या नजरेस आणल्यानंतर त्यांनी डॉ. विजया वाड आणि शारदा खानविलकर यांचा गौरवपत्र देऊन गौरव करण्याची इच्छा व्यक्त केली. त्याप्रमाणे गौरवपत्र घेऊन आज मी खास कॅनडातून येथे आलो.
कॅनडाकडून डॉ. विजया वाड यांचा सन्मान
By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2020 1:56 AM