लॉकडाऊन कालावधीतील बेस्टची वाढीव वीज बिल रद्द करा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2020 06:39 PM2020-07-21T18:39:20+5:302020-07-21T18:39:42+5:30
मुंबईतील बेस्टच्या ग्राहकांना वाढीव वीजेची देयके पाठवण्यात आली आहेत.
मुंबई : कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांचा रोजगार बुडाला आहे. अनेकांना नोकऱ्यांवरुन काढण्यात आले आहे. नागरिकांच्या हातात पैसा नाही अशा परिस्थितीत मुंबईतीलबेस्टच्या ग्राहकांना वाढीव वीजेची देयके पाठवण्यात आली आहेत. हा ग्राहकांवर अन्याय असून बेस्टच्या या कारभाराविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण केबल सेनेने आवाज उठवला आहे. मार्च ते जून या कालावधीतील वीज देयकांमध्ये ग्राहकांना सवलत द्यावी अथवा ही देयके रद्द करावीत, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण केबल सेनेचे अध्यक्ष परेश तेलंग यांनी बेस्ट प्रशासनाकडे केली आहे.
लॉकडाऊन च्या कठीण काळात म्हणजे मार्च ,एप्रिल, जून या महिन्याकरिता बेस्ट प्रशासनांने बेस्ट ग्राहकांना दिलासा देण्याचे सोडून वाढीव वीज देयके पाठवली आहेत. याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण केबल सेनेच्या शिष्टमंडळाने बेस्ट प्रशासनाच्या विभागीय अभियंता, ग्राहक सेवा क प्रभाग यांची भेट घेतली. राज्यातील महाविकास आघाडी चे सरकार आणि मुंबई महानगरपालिकेतील मागील 25 वर्षे सत्ताधारी पक्ष या कठीण काळात गोरगरीब जनतेला कुठलाही प्रकाराचा दिलासा न देता गोड गोड बोलण्यात धन्यता मानत आहेत, असा आरोप तेलंग यांनी केला. या वेळी महाराष्ट्र नवनिर्माण बेस्ट कर्मचारी सेनेचे चिटणीस रूकेश गिरोला, केबल सेनेचे उपाध्यक्ष विद्याधर बने, राजेश जैन आणि महाराष्ट्र सैनिक कबीर चौधरी, निखिल सांगळे उपस्थित होते.