मुंबई : केंद्र सरकारच्या 'अग्निपथ योजने'ला देशभरात विरोध होत आहे. आज सलग तिसऱ्या दिवशी या योजनेच्या विरोधात उग्र निदर्शने सुरू असून, बिहारमधील अनेक जिल्ह्यांमध्ये जाळपोळ झाल्याच्या बातम्या येत आहेत. अनेक ठिकाणी आंदोलकांनी गाड्या पेटवल्या आहेत. तर, भाजप नेत्यांच्या घरावर हल्लेही होत आहेत. याचे पडसाद आता मुंबईत देखील उमटू लागले आहेत. लष्करात जाण्याचे ध्येय उराशी बाळगणाऱ्या लाखो मुलांना कंत्राटीकरणाच्या खाईत ढकलणारी अग्निपथ योजना रद्द झाली पाहिजे अशी मागणी करत छात्रभारतीच्या वतीने आज दादर रेल्वे स्थानकाबाहेर निषेध नोंदवण्यात आला.
१७ ते २२ वर्षाच्या मुलांना ४ वर्षासाठी लष्करात घेणार मग ४ वर्षांनी त्या मुलांनी करायचे काय ? ऐन उच्च शिक्षणाच्या वेळेस मुलांना भरती करुन घेणार आणि मग ४ वर्षांनी त्यांच भविष्य वाऱ्यावर सोडणार ? तरुणांच्या भविष्याशी खेळ करणारी व लष्कराचे कंत्राटीकरण करणारी केंद्रसरकारची ही योजना विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आणणारी आहे असं छात्रभरतीच्या वतीने सांगण्यात आलं. तसेच ही योजना जर मागे घेतली नाही तर महाराष्ट्रातील सर्व खासदार व केंद्रीय मंत्र्यांच्या घरासमोर छात्रभारती तीव्र निदर्शन करेल असा इशारा संघटनेचे राज्यकार्याध्यक्ष रोहित ढाले यांनी दिला.