मुंबई – मागील महिन्यात पावसाने दडी मारल्याने शहरात १० टक्के पाणी कपात लागू करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला होता. परंतु प्रत्यक्षात शहरातील डोंगर भागातील लोकांना पाणीच मिळत नाही. पाणी कपातीमुळे लोकांचे हाल होत आहेत. अधिकृत पाणी कपात १० टक्के असली तरी बहुतांश ठिकाणी ३० टक्क्यांपेक्षा जास्त पाणी कपात होत असल्याचा आरोप भाजपाने केला आहे.
भाजपाचे माजी गटनेते प्रभाकर शिंदे आणि माजी पक्षनेते विनोद मिश्रा यांनी महापालिका आयुक्त, प्रशासक इक्बाल सिंह चहल यांची भेट घेऊन पाणी कपात रद्द करण्याची मागणी केली. शहरात पाणी कपात असल्याने अनेक नागरिकांना त्रासाला सामोरे जावं लागत आहे. याची गंभीर दखल प्रशासनाने घ्यावी अशी मागणी करत भाजपा शिष्टमंडळाने आयुक्तांची भेट घेऊन पाणी कपात रद्द करण्याची मागणी केली आहे.
तसेच भाजपा शिष्टमंडळाच्या मागणीवर पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी लवकरात लवकर शहरातील पाणी कपात रद्द करण्याचा निर्णय घेतला जाईल असं आश्वासन दिले आहे. या शिष्टमंडळात भाजपाच्या माजी नगरसेविका उज्वला मोडक, नगरसेवक अभिजित सामंत, कमलेश यादव, हरिष भांदिर्गे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.