वीज ग्राहकांवरील ऑनलाइन / ऑफलाइन नोंदणीची अट रद्द करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:06 AM2021-09-13T04:06:03+5:302021-09-13T04:06:03+5:30
मुंबई : राज्यातील सर्व यंत्रमागधारक २७ हॉर्स पॉवरच्या आतील व वरील सर्व लघुदाब ग्राहक या वर्गवारीतील वीज ग्राहकांवरील ऑनलाइन ...
मुंबई : राज्यातील सर्व यंत्रमागधारक २७ हॉर्स पॉवरच्या आतील व वरील सर्व लघुदाब ग्राहक या वर्गवारीतील वीज ग्राहकांवरील ऑनलाइन / ऑफलाइन नोंदणीची अट रद्द करा, अशी मागणी करण्यात आली आहे.
राज्य सरकारने फेब्रुवारी २०१८ मध्ये २०१८-२३ या कालावधीसाठीचे वस्त्रोद्योग धोरण जाहीर केले आहे. या धोरणांतर्गत सर्व उच्चदाब यंत्रमागधारक तसेच यंत्रमागपूर्व व यंत्रमागोत्तर सर्व वस्त्रोद्योग घटकांना नवीन वीजदर सवलत लागू केली आहे. या नवीन अंतर्भूत केलेल्या सर्व घटकांना ऑनलाइन नोंदणी करणे व सर्व संबंधित माहिती देणे बंधनकारक केले आहे. त्यानुसार या सर्व नवीन अंतर्भूत केलेल्या घटकांनी नोंदणी केली आहे व करीत आहेत.
तथापि याच नवीन वस्त्रोद्योग धोरणातील काही तरतुदींचा वापर करून ज्या यंत्रमाग घटकांना गेल्या ३३ वर्षांहून अधिक काळ वीजदर सवलत सुरू आहे, त्या सर्व लघुदाब यंत्रमागधारक घटकांनी नव्याने नोंदणी केली पाहिजे, असे वस्त्रोद्योग आयुक्त कार्यालयाने जाहीर केले आहे. ६ ऑक्टोबर २०२१ अखेर नोंदणी न केल्यास या घटकांची वीजदर सवलत बंद करण्यात येईल, असेही जाहीर करण्यात आले आहे. वास्तविक ही अट सरकारनेच गेली ३३ वर्षे वेळोवेळी जाहीर केलेल्या व दिलेल्या सवलतीच्या व धोरणांच्या विरोधी आहे. त्यामुळे ही अट व नोंदणीची तरतूद रद्द करणे आवश्यक आहे, असे वीजतज्ज्ञ प्रताप होगाडे यांनी सांगितले.
-----------------------------
- देशातील अंदाजे २८ लाख यंत्रमागापैकी अंदाजे ४० % म्हणजे ११ लाख यंत्रमाग हे महाराष्ट्रात आहेत.
- महावितरणकडे सर्व लघुदाब यंत्रमाग घटकांची प्रथमपासून संपूर्ण नोंद आहे.
- ३३ वर्षे नोंदणी आहे, त्यांची नव्याने नोंदणी करणे आवश्यक नाही. गरज वाटल्यास तपासणी जरूर करावी, पण नवीन नोंदणी सक्तीची करणे योग्य नाही.
- राज्यातील या सर्व लघुदाब यंत्रमागधारक घटकांची एकूण संख्या अंदाजे ९० हजार आहे.
- त्यापैकी २७ हॉर्स पॉवरच्या आतील ग्राहक अंदाजे ७५ हजार आहेत.
- २७ हॉर्स पॉवरच्या वरील ग्राहक अंदाजे १५ हजार आहेत.
- यंत्रमाग उद्योग मुख्यत: भिवंडी, मालेगाव व इचलकरंजी या केंद्रामध्ये मोठ्या प्रमाणात आहे.
- सोलापूर, माधवनगर, वडगाव, विटा, सांगली, येवला, नागपूर, कामठी, वडवणी छोट्या केंद्रामध्ये आहे.
- हे सर्व यंत्रमागधारक प्रामुख्याने अल्पसंख्याक, इतर मागासवर्गीय व मागासवर्गीय घटकांतील आहेत.
- यापैकी अंदाजे ८०% ग्राहक हे अशिक्षित वा अल्पशिक्षित आहेत.
- ६० % ग्राहक हे मजुरीने व्यवसाय करणारे आहेत.
- यंत्रमाग १० / २० ते ४० / ५० वर्षे जुने आहेत.