Join us

सीएसएमटी-पनवेल उन्नत मार्ग रद्द करण्याच्या हालचाली?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 5:45 AM

मेट्रो प्रकल्पांचा परिणाम : पनवेल-विरार उपनगरी मार्गाचे भवितव्यही अंधारात

मुंबई : मुंबई महानगर प्राधिकरण क्षेत्रात प्रस्तावित मेट्रो आणि इतर प्रकल्पांमुळे सीएसएमटी-पनवेल उन्नतमार्ग आणि पनवेल-विरार उपनगरी मार्गावर टांगती तलवार आली आहे. सध्या सुरू असलेल्या आणि प्रस्तावित मेट्रो मार्गांचा विचार करून या प्रकल्पांचा फेरविचार केला जाईल आणि नव्याने आराखडा तयार केला जाणार आहे. त्यामुळे दोन्ही प्रकल्पांच्या मार्गात मोठे बदल होण्याची शक्यता आहे.

मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या (एमआरव्हीसी) मुंबई नागरी परिवहन प्रकल्प टप्पा - ३ अ (एमयूटीपी ३ ए) अंतर्गत येणाऱ्या सीएसएमटी ते पनवेल उन्नतमार्ग आणि पनवेल ते विरार उपनगरी मार्गांच्या प्रकल्पांवर अंतरिम अर्थसंकल्पात फेरविचार करण्याच्या सूचना एमआरव्हीसीला देण्यात आल्या. या सूचना केंद्रीय अर्थसंकल्पात कायम ठेवण्यात आल्याने दोन्ही प्रकल्पांचा अभ्यास करून प्रकल्पाचा नवीन आराखडा तयार केला जाईल.

या दोन प्रकल्पांवर फेरविचार करून प्रकल्पांची मांडणी करण्यात येणार आहे. प्रकल्पांचा अभ्यास करून ज्याप्रमाणे बदल करता येतील, तसे बदल केले जातील. मुंबईकरांच्या भविष्याचा विचार करून उत्तम प्रकल्प रचना उभारण्यात येईल, असे एमआरव्हीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

कसे होते मूळ प्रकल्प?

सीएसएमटी ते पनवेल जलद मार्गिका

एकूण ५५ किमी लांबीची जलद मार्गिका तयार झाल्यास सीएसएमटी ते पनवेल ५० मिनिटांत पूर्ण होईल. प्रकल्पाला १२ हजार ३०१ कोटी रुपये खर्च येणार आहे.प्रकल्पामुळे मुंबईतील सांताक्रुझ आणि नवी मुंबई येथे तयार होणाऱ्या विमानतळावर पोहोचणे सोईस्कर होईल.च्सध्या मेगाब्लॉकवेळी हार्बर मार्गिकेवर लोकल रद्द करण्यात येतात. मात्र जलद मार्ग झाल्यास या लोकल रद्द होण्याचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे.

पनवेल-विरार मार्गिका

देशाचा उत्तर-पश्चिमेकडील भाग आणि देशाचा दक्षिणेकडील भाग आणि कोकण रेल्वे यांना जोडण्यासाठी पनवेल-वसई रोड- विरार हा मार्ग सोईस्कर होईल. मार्गिकेमध्ये एकूण २४ स्थानकांचा समावेश आहे. यामध्ये ११ नवीन स्थानके उभारण्यात येणार आहेत. सध्या या मार्गावर १३ स्थानके आहेत. या प्रकल्पासाठी ७ हजार ८९ कोटी खर्च येणार असून, एकूण ७० किमी लांबीचा हा प्रकल्प आहे.