परीक्षा रद्द करा; विद्यार्थी, पालकांचे ४ लाखांहून अधिक ट्विट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:06 AM2021-04-07T04:06:55+5:302021-04-07T04:06:55+5:30
शिक्षण विभागाच्या निर्णयाचा निषेध; ट्विटरवर कॅन्सल बोर्ड एक्झाम मोहीम होतेय ट्रेंड लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : एकीकडे दहावी, बारावीच्या ...
शिक्षण विभागाच्या निर्णयाचा निषेध; ट्विटरवर कॅन्सल बोर्ड एक्झाम मोहीम होतेय ट्रेंड
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : एकीकडे दहावी, बारावीच्या ऑफलाइन परीक्षा आणि त्यांचे नियोजन यासंदर्भात शिक्षण विभाग हे शिक्षण तज्ज्ञ व अधिकाऱ्यांशी बैठका घेत असताना दुसरीकडे विद्यार्थी, पालकांनी मात्र परीक्षा रद्द व्हाव्यात यासाठी आता सोशल मीडियाचे शस्त्र हाती घेतले आहे. ६ एप्रिल म्हणजे मंगळवारी विद्यार्थी, पालकांनी ट्विटरवर #cancelboardexams2021 या नावाखाली संध्याकाळपर्यंत तब्बल ४ लाख १९ हजार ट्विट्स करून घेण्यात येणाऱ्या परीक्षांचा निषेध नोंदविला.
अंतर्गत मूल्यमापन, ऑनलाइन पद्धती, असाइन्मेंट्स, मौखिक परीक्षा अशा विविध माध्यमांतून परीक्षा घेतल्या जाव्यात, अशी मागणी विद्यार्थी, पालकांनी या ट्विट्सद्वारे केली. आंदोलने, निषेध आणि मोर्चे झाल्यानंतर आता विद्यार्थी, पालकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला रोष व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ऑफलाइन परीक्षा घेऊन ३० लाख विद्यार्थ्यांची, त्यांच्या कुटुंबीयांची शिवाय पर्यवेक्षक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची सुरक्षितता व आरोग्य धोक्यात घालू नये, असाच या ट्विटर ट्रेंडिंगचा सूर होता.
कोरोना काळात ऑनलाइन शिकविण्यात आलेल्या अभ्यासक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा लिखाणाचा सराव सुटला आहे. त्यांच्या अनेक कन्सेप्ट क्लिअर झालेल्या नाहीत. २५ टक्के अभ्यासक्रमात कपात करण्यात आली असूनही अनेक विषयांचा अभ्यास पूर्ण झाला नाही, अशा तक्रारी विद्यार्थ्यांनी ट्विटमधून केल्या.
कोरोनाकाळात मोठ्यांप्रमाणेच विद्यार्थ्यांना प्रचंड मानसिक ताण आला आहे. अशा परिस्थितीत शाळा, महाविद्यालयांत जाऊन ३ तास संसर्गाच्या भीतीमध्ये परीक्षा देणे म्हणजे जोखमीचे काम असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षितता तर अडचणीत येईलच शिवाय त्यांच्या कुटुंबीयांना संसर्गाची भीती असल्याचे मत त्यांनी मांडले. शिक्षणमंत्री, मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री तसेच केंद्रीय शिक्षणमंत्री आणि पंतप्रधान यांनाही पालकांनी या ट्विटर ट्रेंडिंग मोहिमेत टॅग करून आपला आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला.
कोट
दिवसाला ९ ते ११ हजार रुग्णसंख्या असताना ऑफलाइन परीक्षा घेणे म्हणजे विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार असून दहावी, बारावी परीक्षांसाठी इतर पद्धती अवलंबल्या जाव्यात हीच पालक, विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी आहे. महाराष्ट्रात परिस्थिती गंभीर असताना, सर्व आस्थापना, गोष्टी बंद केल्या जात असताना परीक्षांचा अट्टाहास का? विद्यार्थी, पालकांचा आवाज आंदोलने, निषेध, मोर्चे यांतून सरकारपर्यंत पोहोचत नसल्याने आता त्यांनी हा मार्ग अवलंबला आहे.
- अनुभा सहाय,
अध्यक्षा, इंडिया वाईड पॅरेण्ट असोसिएशन
--------------------