मागासवर्गीय पदोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याचा जीआर रद्द करा, अन्यथा तीव्र आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:06 AM2021-06-27T04:06:16+5:302021-06-27T04:06:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मागासवर्गीय पदोन्नतीतील ३३ टक्के आरक्षण रद्द करण्याचा जीआर रद्द करा अन्यथा तीव्र आंदोलन करू, ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मागासवर्गीय पदोन्नतीतील ३३ टक्के आरक्षण रद्द करण्याचा जीआर रद्द करा अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा आरक्षण हक्क कृती समितीने दिला आहे. मागासवर्गीय पदोन्नतीतील ३३ टक्के आरक्षण रद्द करण्याचा जीआर ७ मे रोजी काढण्यात आला होता. त्याविरोधात आझाद मैदान येथे शनिवारी आरक्षण हक्क कृत्ती समितीच्या वतीने आक्रोश मोर्चा काढण्यात आला.
या वेळी ओबीसी नेते प्रकाश अण्णा शेंडगे म्हणाले की, मागासवर्गीय आरक्षण काढण्याचे पाप सरकारने केले आहे. या अन्यायाविरोधात आमचा एल्गार आहे. आम्हाला न्याय दिला नाही तर मंत्र्यांना राज्यात फिरू देणार नाही, असे ते म्हणाले.
हरिभाऊ राठोड म्हणाले, आरक्षण पदोन्नती हा विषय राज्य सरकारने निकालात न काढल्यास येत्या निवडणुकीमध्ये ओबीसी नेते व मतदार मतदानावर बहिष्कार टाकतील व राज्य सरकारला त्यांची जागा दाखवून देतील. आक्रोश आंदोलनामध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे, डॉ. राजेंद्र गवई, डॉ. संजय कांबळे, शरद कांबळे, आत्माराम पाखरे, सुनील निर्भवणे, एस.के. भंडारे आदी उपस्थित होते.
चर्मकार विकास संघ प्रदेशाध्यक्ष संजय खामकर म्हणाले की, मागासवर्गीय पदोन्नतीतील ३३ टक्के आरक्षण राज्य सरकारने रद्द केले, त्याचा तीव्र निषेध करतो. आपण जन्मापासून ते मृत्यूपर्यंत संघर्ष करत आलो आहोत. अन्याय अत्याचार सहन करण्याचे दिवस गेले असून आम्ही संघर्ष करणारे आहोत हे सरकारने लक्षात घ्यावे. आमच्या मागण्या सरकारने मान्य केल्या नाहीत तर आंदोलन आणखी तीव्र करू तसेच सरकारला घरी पाठवू, असेही ते म्हणाले.
आंदोलन घोषणा
आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे.
आमच्या मागण्या पूर्ण करा, नाहीतर खुर्च्या खाली करा.
मागासवर्गीयांवर अन्याय करणाऱ्या सरकारचा निषेध असो.
मागासवर्गीय अधिकारी, कर्मचारी एकजुटीचा विजय असो.
आरक्षण हक्क कृती समितीचा विजय असो.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो.