भाडेतत्त्वावरील एसटी बस करार रद्द करा : भरत गोगावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 09:50 IST2024-12-12T09:50:40+5:302024-12-12T09:50:59+5:30
पुरवठ्यास विलंब झाल्याने कंपनीला बजावणार कारणे दाखवा नोटीस

भाडेतत्त्वावरील एसटी बस करार रद्द करा : भरत गोगावले
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्य परिवहन (एसटी) महामंडळातील भाडेतत्त्वावरील बसच्या समावेशाला विलंब होत असल्याने बस पुरवठादार कंपनीबरोबरचा करार रद्द करण्याच्या सूचना महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले यांनी दिल्या. महाराष्ट्र वाहतूक भवनात बुधवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
एमओव्हीईझेड ईव्ही बस (वन) आणि इवे ट्रान्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. बस विलंबामागे योग्य, वस्तुनिष्ठ आणि सबळ नसल्यास करार रद्द करण्याच्या सूचना एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना गोगावलेंनी दिल्या आहेत.
सध्या एसटी महामंडळाकडे १४००० बसेस असून, त्या अत्यंत अपुऱ्या पडत आहेत. त्यापैकी अनेक बसेस जुन्या झाल्या आहेत. काही बसेस कालबाह्य होण्याच्या उंबरठ्यावर आहेत. हे लक्षात घेता निविदापात्र संस्थांनी नव्या बसचा पुरवठा वेळेत करणे अत्यंत आवश्यक होते. फेब्रुवारीपासून आत्तापर्यंत प्रत्येक महिन्याला २०० बस याप्रमाणे २००० बस येणे अपेक्षित असताना केवळ १८१ बस उपलब्ध झाल्याने त्या संस्था बस पुरविण्यास सक्षम का नाहीत, याची शहानिशा करून त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावावी, असे निर्देश अध्यक्ष गोगावले यांनी एसटी प्रशासनाला दिले.
सोमवारी कुर्ल्यात घडलेला बेस्टचा अपघात आणि भंडारा, नाशिक येथे झालेल्या एसटीच्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर अध्यक्ष गोगावले यांनी एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीला एसटीला भाडेतत्त्वावर ई-बसचा पुरवठा करणाऱ्या कंपनीचे प्रतिनिधी तसेच एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर व एसटीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
अपघातांमध्ये होणारी वाढ आणि बस पुरवठ्यास होणारा विलंब या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वपूर्ण होती.
सुरक्षा त्रिसूत्री
चालक प्रशिक्षण, चालकांची निवड चाचणी
मानसिक आरोग्य
तांत्रिकदृष्ट्या निर्दोष वाहन उपलब्धता
भाडेवाढ अटळ?
एसटी कर्मचाऱ्यांचे वाढते वेतन, इंधनाचा वाढता दर, टायर आणि सुटे भागांची वाढती किंमत विचारात घेऊन २०२१ पासून प्रलंबित असलेली एसटीची भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव लवकरच शासनाला सादर केला जाईल, अशी माहिती गोगावले यांनी दिली. त्यामुळे येत्या काळात एसटीच्या भाड्यात वाढ अटळ असल्याचे संकेत मिळाले आहेत.
सुमारे ५५ लाख एसटी प्रवाशांना सुरक्षित सेवा देण्यासाठी अपघात कमी करण्यास प्राधान्य देण्यात येईल. त्यासाठी त्रिसूत्रीचा अवलंब केला जाईल.
- भरत गोगावले, अध्यक्ष, एसटी
ई-बस प्रकल्पाला मी पहिल्यापासून विरोध केला आहे. हा प्रकल्प चुकीच्या पद्धतीने राबविण्यात येत होता. कंपनीने वेळेत गाड्या पुरविल्या नाहीत. याशिवाय प्रती किलोमीटर २५ रुपयांचा तोटा एसटीला सहन करावा लागत आहे. संबंधित कंपनीशी करार करणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी. भाडेतत्त्वावरील बस करार रद्द करून एसटीने गाड्या खरेदी कराव्यात.
- श्रीरंग बरगे,
सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी
कर्मचारी काँग्रेस