मुंबई पालिकेची जल अभय देयक योजना रद्द करा, गोरेगाव प्रवासी संघाची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2021 07:10 PM2021-06-04T19:10:10+5:302021-06-04T19:10:35+5:30
मुंबई महानगरपालिका प्रशासनाने जल देयकांबाबत अभय योजना २०२१ जाहिर केली आहे. सदर योजनेनुसार जल देयकावर आकारण्यात आलेले व्याज किंवा दंड न भरता फक्त देयकाची रक्कम द्यावी अशी तरतूद आहे .
मुंबई महानगरपालिका प्रशासनाने जल देयकांबाबत अभय योजना २०२१ जाहिर केली आहे. सदर योजनेनुसार जल देयकावर आकारण्यात आलेले व्याज किंवा दंड न भरता फक्त देयकाची रक्कम द्यावी अशी तरतूद आहे . जल देयके अदा न करणाऱ्यांची यादी अनेक पानी आहे . या यादीचे अवलोकन केले असता गेली काही वर्षे जल देयके न भरणाऱ्या गोरगावतील सुमारे 400 धनिकांची व प्रतिष्ठितांची नावे या यादीत आहेत. त्यामुळे या योजनेचा गैरफायदा घेतला जात असून सदर योजना रद्द करा अशी आग्रही मागणी गोरेगाव प्रवासी संघाचे अध्यक्ष उदय चितळे यांनी पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांना एका पत्रकाद्वारे केली आहे.सदर पत्रकाची प्रत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर,जल अभियंता व पी दक्षिण वॉर्डचे सहाय्यक आयुक्त संतोषकुमार धोंडे यांना सुद्धा दिली असल्याचे त्यांनी सांगितले.
पाणी हि जीवनाश्यक गोष्ट आहे, तसेच पावसाचे पाणी तलावात साठवून, प्रक्रिया करून ते पाणी पिण्यायोग्य करण्याची जबाबदारी मुंबई मनपा गेली अनेक वर्षे पार पाडत आहे . जल साठवण, शुद्धीकरण , वितरण यासाठी अनेक मुंबई मनपा अभियंते , कर्मचारी अहोरात्र काम करीत असतात . याकामी खर्च होणारे करोडो रुपये इमाने इतबारे करभरणा करणाऱ्या नागरिकांच्या देयाकाद्वारे मुंबई मनपाला मिळत असतात . पाणी पुरवठा खंडित झाला , अथवा कमी दाबाने झाला तर असंख्य नागरिक व जनप्रतिनिधी मुंबई मनपा प्रशासनाला धारेवर धरतात ही वस्तुस्थिती सुद्धा उदय चितळे यांनी पत्रात विषद केली आहे.
यासर्व बाबींचा विचार करता सदर अभय योजना म्हणजे मुंबई मनपाच्या महसुलाला कात्री लावण्याचा आतबट्ट्याचा व्यवहार आहे .त्यामुळे सदर अभय योजना तत्काळ रद्द करून जलदेयकांची येणे रक्कम व्याज, दंड यासह वसूल करावी .अभय योजनेबाबत पालिका प्रशासनावर दबाव आणणाऱ्या व या योजनेस मान्यता देणाऱ्या मुंबई मनपा प्रशासनातील अधिकाऱ्यांचा गोरेगाव प्रवासी नागरिक संघाने तीव्र शब्दात निषेध केला असल्याचे चितळे यांनी शेवटी पत्रात नमूद केले आहे.