मनोहर कुंभेजकर
मुंबई-रिक्षा-टॅक्सी मीटर्सची छेडछाड करून ग्राहकांकडून ज्यादा भाडे वसूल केले जाणे ही ग्राहकांची नेहेमीचीच तक्रार राहिली आहे. त्यामुळे ज्यांच्या विरुध्द तक्रार त्यांच्याच संघटनेला मीटर रिकॅलिब्रेशनसाठी टेबल टेस्टिंगला परवानगी देणे हे न्यायोचित ठरत नाही. यामुळे टेबल टेस्टिंगची सदर प्रक्रियाच सदोष आणि विश्वासार्हतेला तडा देणारी ठरते. परिवहन प्राधिकरणाने घेतलेला हा निर्णय कायद्याच्या कसोटीवर उतरणारा नसल्याने तो त्वरीत रद्द करण्याचा आदेश आपण द्यावा अशी आग्रहाची विनंती मुंबई ग्राहक पंचायतचे कार्याध्यक्ष अँड.शिरीष देशपांडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एका पत्राद्वारे केली आहे.
मुंबई रिक्षामेन्स युनियनला रिक्षा/टॅक्सी इलेक्ट्रॉनिक मीटरच्या रिकॅलिब्रेशन संदर्भात टेबल टेस्ट करण्यासंबंधी मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाने नुकतीच परवानगी दिली असल्याचे समजते असे त्यांनी सांगितले.
मीटर रिकॅलिब्रेशन प्रक्रियेत सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे अचुकता आणि विश्वासार्हता. ज्या घटकांचे हितसंबंध मीटर रिकॅलिब्रेशन प्रक्रियेत बाधित होतात किंवा त्यांचे स्वारस्य असते किंवा जे लाभार्थी असतात त्या मीटर उत्पादकांनी, टॅक्सी/ रिक्षा चालक/ मालक संघटनांनी आणि ग्राहक संघटनांनी या प्रक्रियेपासून दूर राहण्याचे पथ्य पाळणे आवश्यक आहे. या तिन्ही घटकांपैकी कोणावरही रिकॅलिब्रेशनची जबाबदारी सोपवण्याने या प्रक्रियेच्या विश्वासाहर्तेपुढे प्रश्नचिन्ह उभे राहते. किंबहुना यामुळेच एक मीटर उत्पादक सॅनसुई यांना रिकॅलिब्रेशनची परवानगी परिवहन प्राधिकरणाने नाकारली आहे आणि ते योग्यच आहे. किंबहुना त्याच निकषावर रिक्षा युनियनलासुध्दा परवानगी नाकारणे आवश्यक होते अशी भूमिका त्यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे मांडली आहे.
सदर रिकॅलिब्रेशन हे तांत्रिकदृष्ट्या सक्षम आणि स्वतंत्र अशा त्रयस्थ संस्थांकडून करणे आवश्यक आहे आणि त्यानुसार परिवहन प्राधिकरणाने अशा तांत्रिक संस्थांनाच याबाबत परवानगी दिली जावी असेही निर्देश आपण परिवहन प्राधिकरणाला द्यावेत अशी विनंती शेवटी अँड.शिरीष देशपांडे यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.