मुंबई : धारावीतील भव्य क्रीडा संकुल एका बिल्डरच्या घशात टाकण्यासाठी चाललेल्या हालचालींविरुद्ध आता काँग्रेसच्या स्थानिक आमदार वर्षा गायकवाड सरसावल्या आहेत. हे कंत्राट रद्द केले नाही तर धारावीकरांचे आंदोलन उभारण्याचा इशारा त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात दिला आहे.धारावी क्रीडा संकुलाच्या खासगीकरणास माझा तीव्र विरोध आहे. हे जिल्हा क्रीडा संकुल तोट्यात असल्याचा क्रीडा विभागाचा कांगावा हा बिल्डर कंत्राटदाराच्या हितासाठी केला जात आहे. खासगीकरणात कोणाचे हितसंबंध जपले जात आहेत याची सखोल चौकशी करा, अशी मागणी गायकवाड यांनी या पत्रात केली आहे. हे खासगीकरण रद्द केले नाही तर धारावीतील जनता रस्त्यावर उतरेल आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्यासाठी सरकार जबाबदार असेल, असे त्यांनी म्हटले आहे.धारावी मतदारसंघ हा झोपडपट्ट्यांनी व्यापलेला आहे. येथील गोरगरीब लोकांच्यामुलांना खेळण्याची चांगली संधी मिळावी यासाठी संघर्ष करून हे संकुल उभारले गेले. आता त्याचे खासगीकरण करून क्लब चालविला जाणार आहे. तेथील शुल्क सामान्यांच्या आवाक्याबाहेर जाईल. त्यामुळे खासगीकरणास आमचा विरोध असल्याचे गायकवाड यांनी म्हटले आहे.हे खासगीकरण करू नये, असा अभिप्राय क्रीडा विभागाने दिलेला होता. खासगीकरणाची निविदा प्रसिद्ध करण्यापूर्वी आर्थिक सल्लागाराची नेमणूकच करण्यात आली नव्हती याकडे त्यांनी पत्रात लक्ष वेधले आहे.
धारावी क्रीडा संकुलाचे खासगीकरण रद्द करा, वर्षा गायकवाड यांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2019 2:39 AM