१६८ कोटी रुपयांचे प्रस्तावित सायकलिंग ट्रॅकचे काम रद्द करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:09 AM2021-08-25T04:09:58+5:302021-08-25T04:09:58+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई- वांद्रे ते माहीम येथे प्रस्तावित असलेल्या ३.७४ किलोमीटर लांबीच्या “सायकलिंग ट्रॅक”च्या १६८ कोटी रुपयांचे काम ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई- वांद्रे ते माहीम येथे प्रस्तावित असलेल्या ३.७४ किलोमीटर लांबीच्या “सायकलिंग ट्रॅक”च्या १६८ कोटी रुपयांचे काम प्रस्तावित आहे. सुमारे ४४ कोटी रुपये प्रति किलोमीटर एवढ्या खर्चाचा असून, सदर खर्च हा हायवेच्या कामाच्या ५०० पट आहे. त्यामुळे १६८ कोटी रुपयांचे प्रस्तावित सायकलिंग ट्रॅकचे काम रद्द करा आणि मुंबईकरांचा पैसा अधिक चांगल्या कामांसाठी कोविड काळात जनतेच्या उपयोगासाठी वापरावा, अशी मागणी अंधेरी पश्चिम विधानसभेचे आमदार अमित साटम यांनी पालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.
त्यांनी व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.
जनतेच्या पैशाचा चुराडा करून १६८ कोटी रुपयांचे टेंडर काढणारा पालिकेतील सचिन वाझे कोण, असा सवाल त्यांनी केला आहे.
१६८ कोटी रुपयांच्या “सायकलिंग ट्रॅक”साठी अश्या प्रकारे जनतेच्या पैशाचा चुराडा कोणाच्या हट्टापाई किंवा कुणाला फायदा पोहोचविण्यासाठी होत आहे, असा मुंबईकरांचा सवाल आहे.
सदर काम हे स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिकांना विश्वासात न घेता प्रस्तावित करण्यात आले आहे, असा आरोप आमदार अमित साटम यांनी केला.
बृहन्मुंबई महानगरपालिका गेली २४ वर्षात २१ हजार कोटी खर्च करूनही मुंबई शहराला चांगले रस्ते देऊ शकले नाही. पादचाऱ्यांकरिता अतिक्रमण विरहीत पदपथ व वाहनांसाठी चांगले रस्ते ही मुंबईची गरज आहे, असा टोला त्यांनी लगावला आहे.