दहावी भूगोलाचा पेपर रद्द करून सरासरी गुण द्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2020 03:46 PM2020-04-11T15:46:47+5:302020-04-11T15:47:18+5:30

लॉकडाऊन वाढण्याच्या शक्यतेनंतर शिक्षण संघटना व पालकांची धास्ती वाढली; शिक्षण संघटनांची पेपर रद्द करण्याची मागणी

Cancel the tenth geographical paper and give the average score! | दहावी भूगोलाचा पेपर रद्द करून सरासरी गुण द्या !

दहावी भूगोलाचा पेपर रद्द करून सरासरी गुण द्या !

Next

मुंबई : एकीकडे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता उर्वरीत दहावी भूगोलाच्या पेपर बद्दल लवकरच निर्णय घेऊन हा पेपर  रद्द होण्याची शक्यता आहे. १४ एप्रिलनंतर घेण्यात येणाऱ्या भूगोल विषयाची परीक्षा रद्द करून १८ लाखाहून अधिक विद्यार्थी व त्यांच्या पालकांना दिलासा द्यावा , त्यांना चिंतामुक्त करावे अशी मागणी शिक्षक परिषदेकडून करण्यात आली आहे. या परिस्थितीत बेस्ट ऑफ फाईव्ह किंवा झालेल्या परीक्षांच्या आधारावर सरसरी गुण काढून यावर मार्ग शिक्षण विभागाने काढावा असे मत पालक आणि शिक्षकांकडून व्यक्त होत आहे. सद्यपरिस्थित शिक्षक व विद्यार्थी सुरक्षिततेसाठी हा उपाय अवलंबणे आवश्यक असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.

दहावीचा भुगोलाचा शेवटचा पेपर २१ मार्च २०२० रोजी घेण्यात येणार होता , मात्र कोरोना विषाणुच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे हा पेपर पुढे ढकलण्यात आला. आता हा लॉकडाऊन आणि सद्यस्थितीत कोरोनाचा राज्यातील वाढता आकडा पाहता हा लॉकडाऊन वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पालक  शिक्षक संघटनाकडून ही मागणी होत आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये या दृष्टिकोनातून सरासरी गुणांची भूमिका शिक्षण विभागणे घ्यावी अशी मागणी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड़ यांच्याशी दूरध्वनीद्वारे झालेल्या चर्चेदरम्यान केली आहे. या मागणीच्या अनुषंगाने सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासनही  वर्षा गायकवाड यांनी दिले. ज्यावेळी संचारबंदी राज्यात लागू करण्यात आली त्यावेळी याबाबत तातडीने निर्णय घेऊन १४ एप्रिल नंतरची पुढील परिस्थिती पाहून हा पेपर कधी घ्यायचा हा निर्णय घेतला जाईल असा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी त्यावेळी सांगितले होते. मात्र सद्यपरिस्थिती पाहता हा पेपर रद्द करण्यात येणार असल्याची माहिती आहे. विद्यार्थ्यांच्या अकरावी प्रवेशावर या पेपरच्या गुणाचा परिणाम होणार नाही, याची खबरदारी घेतली जाऊ शकते. या पार्श्‍वभूमीवर दहावीचा निकाल पाच विषयांचाच लावायचा की पाच विषयांच्या गुणांची सरासरी करुन भुगोल विषयाला गुण द्यायचे याबाबत विचारविनिमय केला जात आहे. याबाबत सरासरी गुण किंवा अन्य मार्ग निवडताना इतिहास व भूगोल या विषयांचे "अंतर्गत  २० गुण" विचारात घेतले जावेत. अंतर्गत गुण या आगोदरच सर्व शाळांनी  शिक्षण मंडळाकडे पाठवले आहेत. याशिवाय आज असलेली स्थिती लक्षात घेऊन झालेल्या परीक्षेच्या उत्तर पत्रिका सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून शिक्षकांपर्यंत पोहचल्यास पेपर तपासणीचे काम घरून होऊ शकेल.' अशी मागणी राज्य शिक्षक परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी पत्र लिहून केली आहे
 
तर ही परीक्षा रद्द केल्यास बेस्ट ऑफ फाईव्ह विषय असल्याने फार मोठा निकालावर फरक पडणार नाही. ही घोषणा लवकरात लवकर करून पालक, शिक्षक व विद्यार्थी यांना तणावमुक्त करावे. नववीसाठी तसेच अकरावीसाठी शिक्षण विभागाने जुन महिन्यात निर्णय घ्यावा, अशी मागणी हंसराज मोरारजी पब्लिक स्कूल अंधेरीचे शिक्षक उदय नरे तसेच भाजप शिक्षक आघाडीच्या संयोजक अनिल बोरनारे यांनी केली आहे. त्यामुळे लवकरच हा निर्णय घेऊन हा पेपर रद्द करण्याची आणि पुढील संभ्रम दूर करण्याची शक्यता आहे.

Web Title: Cancel the tenth geographical paper and give the average score!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.