"निवडक विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क देण्याचा निर्णय रद्द करून सुधारित निकाल लावा"

By रेश्मा शिवडेकर | Published: June 10, 2024 09:02 PM2024-06-10T21:02:18+5:302024-06-10T21:02:34+5:30

नीट-युजीच्या सदोष निकालावरून राज्याची केंद्र सरकारकडे मागणी

"Cancel the decision to grant grace marks to selected students and issue revised results" - Maharashtra State Government | "निवडक विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क देण्याचा निर्णय रद्द करून सुधारित निकाल लावा"

"निवडक विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क देण्याचा निर्णय रद्द करून सुधारित निकाल लावा"

मुंबई - नीट-युजीमध्ये निवडक विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क देण्याचा निर्णय रद्द करून सर्वच विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांचे पुनर्मुल्यांकन करून सुधारित निकाल लावण्याची मागणी राज्य सरकारने केंद्राकडे केली आहे. तसेच, सर्व उत्तरपत्रिकांचे (ओएमआर शीट्स) फॉरेन्सिक ऑडिट करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

ही चौकशी पूर्ण होईपर्यंत केंद्रीय स्तरावरील वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया स्थगित ठेवण्याची विनंती राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे यांनी केंद्राच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाला पत्र लिहून केली आहे. नीट-युजीचे आयोजन करणाऱया नॅशनल टेस्टिंग एजन्सीलाही (एनटीए) पत्र लिहून विद्यार्थी-पालकांच्या शंकांचे निरसन तातडीने करण्याची मागणी करण्यात आली आहे.

एनटीएने ४ जूनला जाहीर केलेल्या नीट-युजीच्या सदोष निकालावरून राज्यातील विद्यार्थी-पालकांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन निवेदन दिले होते. त्यावर राज्यातील विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये यासाठी त्यांच्या पाठिशी उभे राहण्याचे आश्वासन मुश्रीफ यांनी दिले. यावेळी नीट-युजीच्या निकालाचे फॉरेन्सिक ऑडिट करण्याची, ग्रेस मार्क रद्द करण्याची मागणी पालकांनी केली होती.

नीट-युजीचा निकाल जाहीर झाल्यापासून राज्यासह देशभर विद्यार्थी पालकांमध्ये अस्वस्थता आहे. यंदा नीटच्या कटऑफमध्ये अनैसर्गिक वाढ झाल्याने रँकमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. पालकांच्या मागणीवरून राज्यातील मेडिकलची प्रवेश प्रक्रिया आधीच स्थगित करण्यात आली आहे.

राज्याने लिहिलेल्या पत्रातील मुद्दे
-नीट-युजीच्या माहितीपत्रकात कुठेही वेळ कमी पडल्याने ग्रेस मार्क देण्याचा मुद्दा समाविष्ट नव्हता. तरिही दीड हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना एनटीएने ग्रेस मार्क दिले आहेत.
-एनटीएने जाहीर केलेले ओएमआर शीट आणि गुण स्कोर कार्डशी जुळत नाहीत.
-ग्रेस मार्कमुळे ऑल इंडिया रँकमध्ये अनैसर्गिक वाढ झाली आहे.
-यामुळे राज्यातील विद्यार्थ्यांवर अन्याय होणार आहे.

Web Title: "Cancel the decision to grant grace marks to selected students and issue revised results" - Maharashtra State Government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.