‘त्या’ बदल्या रद्द करा, राज्य निवडणूक आयोगाने दिला दणका; सगळ्याच बदल्यांची आता खातरजमा करा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2024 06:12 AM2024-02-23T06:12:08+5:302024-02-23T06:13:12+5:30
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार ज्या बदल्या झालेल्या नाहीत त्या रद्द करा आणि निर्देशांनुसार नव्याने बदल्या करा, असा आदेश राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने पोलिस महासंचालक कार्यालयाला दिला आहे.
यदु जोशी
मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार ज्या बदल्या झालेल्या नाहीत त्या रद्द करा आणि निर्देशांनुसार नव्याने बदल्या करा, असा आदेश राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने पोलिस महासंचालक कार्यालयाला दिला आहे. चुकीच्या पद्धतीने केलेल्या बदल्यांबद्दल आयोगाने हा दणका दिला. असा आदेश देण्यात आल्याच्या वृत्ताला राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी व राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव श्रीकांत देशपांडे यांनी दुजोरा दिला.
ज्या पोलिस अधिकाऱ्याचा एकाच जागेवरील कार्यकाळ तीन वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक झालेला असेल त्याची अन्य जिल्ह्यात बदली करा, असे स्पष्ट निर्देश आयोगाने दिलेले असतानाही बऱ्याच अधिकाऱ्यांच्या त्याच जिल्ह्यात बदल्या करण्यात आल्याची गंभीर दखल निवडणूक आयोगाने घेतली आहे.
जेथील अधिकारी मॅटमध्ये गेले त्याच जिल्ह्यांतील नव्हे तर, सगळ्या जिल्ह्यांमधील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या आयोगाच्या निर्देशांनुसार झालेल्या आहेत की नाही याची खातरजमा करा आणि निर्देश डावलून केलेल्या बदल्या रद्द करा व नव्याने बदल्या करा, असे आयोगाने बजावले.
‘त्या’ आयुक्त, सीईओंच्याही बदल्या करा
तीन वर्षांचा कार्यकाळ एकाच जागी पूर्ण केलेले महापालिका आयुक्त आणि अतिरिक्त महापालिका आयुक्त यांची अन्य जिल्ह्यात बदली करा, असे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले आहेत. या दोन पदांवरील अधिकाऱ्यांचा निवडणुकीशी थेट संबंध येत नाही, असा तर्क देऊन आधी त्यांच्या बदल्या सरकारने केलेल्या नव्हत्या; पण, आता त्या कराव्या लागणार आहेत. केंद्रीय आयोगाचा हा आदेश राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्या कार्यालयाला गुरुवारी प्राप्त झाल्यानंतर या बदल्या करण्याचे आदेश त्यांच्या कार्यालयाने सामान्य प्रशासन विभागाला लगेच दिले.
याशिवाय, असे विभागीय आयुक्त आणि जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी त्यांच्या अखत्यारीतील कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या निवडणूक व्यवस्थेशी संबंधित कामांकरिता नियुक्त्या केलेल्या आहेत अशा आयुक्त, सीईओंच्याही बदल्या करण्याचे आदेश आयोगाने दिले आहेत. त्यामुळे आता महापालिका आयुक्त, जिल्हा परिषदांचे सीईओ यांच्याही मोठ्या प्रमाणात बदल्या होण्याची शक्यता आहे.
पाच शहरांमध्येच १०७ बदल्या निर्देश डावलून
पुणे, पिंपरी-चिंचवड, ठाणे, नाशिक आणि सोलापूर पोलिस आयुक्त कार्यालयाच्या अखत्यारित १०७ बदल्या निवडणूक आयोगाच्या निर्देशांची पायमल्ली करून झाल्याचे उघड झाले. या आयुक्तालयांमध्ये लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर २२६ बदल्या करण्यात आल्या.
१०७ म्हणजे ५२ टक्के बदल्या निर्देशांनुसार करण्यात आलेल्या नाहीत अशी बाब राज्य निवडणूक कार्यालयाच्या निदर्शनास आली आहे.