Join us

वाढवण बंदर रद्द करा, १७ नोव्हेंबर रोजी मच्छिमारांचा मंत्रालयावर धडक मोर्चा

By मनोहर कुंभेजकर | Published: September 25, 2022 10:23 AM

विद्यमान केंद्र सरकारने वाढवण बंदर विकसित करण्यासाठी व सागरमाला योजना देशातील मच्छिमारांवर लादण्यासाठी सीआरझेड २०१९ मच्छिमारांना विश्वासात न घेता लागू केला.

मुंबई- एकच जिद्द, वाढवण बंदर रद्द,चला वाढवण बंदरा विरोधात तीव्र आंदोलन करूया,चलो मंत्रालय असा नारा देत गुरूवार दि, १७ नोव्हेंबर २०२२ रोजी चलो  मंत्रालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे.तर महात्मा गांधी जयंती दिवशी रविवार दि, २ ऑक्टोबर  रोजीवाढवण बंदरातून जेएनपीटी चले जाव,गो बँक टू जेएनपीटी असा नारा देत  मच्छिमार्केट व मासेमारी बंद ठेवून गांवोगावी आंदोलन, निर्दशने करण्यात येणार आहे. महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे सरचिटणीस किरण कोळी यांनी लोकमतला ही माहिती दिली.

गुरूवार दि, १५ सप्टेंबर  रोजी ठाणे जिल्हा मच्छिमार समाज संघाच्या सभागृहात वाढवण बंदर विरोधी संघर्ष समिती चे अध्यक्ष  नारायण पाटील यांच्या अध्यक्षतेखालील नॅशनल फिशवर्कर्स फोरम, महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती, ठाणे जिल्हा मच्छिमार मध्यवर्ती सहकारी संघ, ठाणे जिल्हा मच्छिमार समाज संघ, भूमिसेना-आदिवासी एकता परिषद, कष्टकरी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने सभा झाली. त्यावेळी वाढवण बंदरा विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा निर्णय एकमतनाने घेण्यात आला अशी माहिती किरण कोळी यांनी दिली.

चलो मंत्रालय आंदोलन यशस्वी करण्यासाठी जनसामान्यांपर्यंत जनजागृती करण्यासाठी एनएफएफ,महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती सदस्यांनी, सर्व समित्या, सहकारी संघ, सहकारी मच्छिमार संस्था, गाव पाटील, नाखवा मंडळ, सरपंच तसेच समाज ज्ञाती, यांनी आपआपल्या भागातून किमान १ हजार माणसे आंदोलनात उतरविण्याची तयारी करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला अशी माहिती महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष लिओ कोलासो व कार्याध्यक्ष  रामकृष्ण तांडेल यांनी दिली. 

विद्यमान केंद्र सरकारने वाढवण बंदर विकसित करण्यासाठी व सागरमाला योजना देशातील मच्छिमारांवर लादण्यासाठी सीआरझेड २०१९ मच्छिमारांना विश्वासात न घेता लागू केला. तसेच इंडियन पोर्टस बील २०२२ चा मसुदा तयार आहे. हे बील लागू झाले तर समुद्र व किनारे विकून देशातील मच्छिमारांना देशोधडीला लावतील अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

या बैठकीला लिओ कोलासो,रामकृष्ण तांडेल ,किरण कोळी, महिला संघटक पूर्णिमा मेहेर, सचिव ज्योती मेहेर,मोरेश्र्वर वैती उल्हास वाटकर,उज्वला पाटील,राजेन मेहेर, अशोक अंभिरे,अशोक नाईक,मोरेश्र्वर पाटील,फिलिप मस्तान,जयकुमार भाय,जगदीश नाईक,राजेश्री भानजी तसेच समितीचे जिल्हाध्यक्ष मानवेंद्र आरेकर (पालघर),वेलेरीन पांडीक (ठाणे),परशुराम मेहेर (मुंबई),मनोहर बैले (रायगड),पी. एन. चौगुले, ( रत्नागिरी), दिलिप घारे (सिंधुदुर्ग) आणि इतर मान्यवर उपस्थित होते.