बंगालसह सर्व प्रचार दौरे रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 04:05 AM2021-03-30T04:05:17+5:302021-03-30T04:05:17+5:30
बंगालसह सर्व प्रचार दौरे रद्द दिग्गजांकडून शरद पवारांची विचारपूस लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ...
बंगालसह सर्व प्रचार दौरे रद्द
दिग्गजांकडून शरद पवारांची विचारपूस
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ३१ मार्चला पोटाची शस्त्रक्रिया होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पवार यांचे आगामी सर्व कार्यक्रम तातडीने रद्द करण्यात आले आहेत. सध्या बंगालमध्येही राज्यातील विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. बंगालमध्ये भाजपविरोधात तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांना पाठिंबा देण्यासाठी पवार बंगालच्या दौऱ्यावर जाणार होते. तो कार्यक्रम आता रद्द करण्यात आला आहे, याशिवाय केरळ आणि तामिळनाडूत राष्ट्रवादी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. केरळमध्येही पवार प्रचार दौरे करणार होते. मात्र, आता प्रकृती अस्वास्थ्यामुळे सर्व निवडणूक प्रचार दौरे आणि नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.
दरम्यान, पवारांच्या प्रकृतीबाबतचे वृत्त कळताच, विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांची विचारपूस करत, त्यांच्या उत्तम स्वास्थ्यासाठी प्रार्थना करत, सदिच्छा दिल्या. केंद्रीय आरोग्यमंत्री डाॅ.हर्षवर्धन यांनी फोन करून विचारपूस केल्याचे पवार यांनी ट्विटरवर सांगितले, तसेच भारतरत्न लता मंगेशकर यांनीही प्रकृतीची आस्थेने विचारपूस केली. लता दिदींसारख्या सुहृदय व्यक्तींच्या सदिच्छा माझ्यासोबत आहेत. त्यांचा मी मनपूर्वक आभारी आहे, असे पवार यांनी म्हटले. या पाठोपाठ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह मनसे प्रमुख राज ठाकरे, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग, निर्मला सीतारमन यांनी विचारपूस केल्याचेही पवार यांनी ट्विट करून सांगितले.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही पवार यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी सदिच्छा दिल्या.