ईडी कार्यालयात जाणे रद्द; शरद पवार पूरग्रस्त पुणेकरांच्या भेटीसाठी रवाना
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2019 03:28 PM2019-09-27T15:28:00+5:302019-09-27T15:34:25+5:30
ईडीच्या कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी शरद पवार मुंबईत होते. मात्र पोलिसांच्या विनंतीनुसार ईडी कार्यालयात जाणार नसल्याचे सांगितले. त्यानंतर शरद पवार मुंबईहून पुण्याला तात्काळ रवाना झाले आहेत.
मुंबई: राज्य सहकारी बँकेतील कथित आर्थिक घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह बँकेच्या तत्कालीन संचालकांवर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे शरद पवार आज मुंबईमधील ईडीच्या कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांशी समक्ष चर्चा करणार होते. मात्र पवारांनी घराबाहेर पडू नये अन्यथा कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडू शकते अशी विनंती पोलिसांनी शरद पवारांनी केली. त्यानंतर शरद पवारांनी माध्यमांशी संवाद साधत पोलिसांच्या विनंतीला मान देत ईडी कार्यालयात जाणार नसल्याचे स्पष्ट केले. मात्र पुण्यात पावसाच्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या नुकसानाची पाहणा करण्यासाठी तात्काळ पुण्याला रवाना होत असल्याचे शरद पवारांनी ट्विट करत सांगितले.
शरद पवारांनी ट्विट करत सांगितले की, पुणे शहर व जिल्ह्यातील बारामती, पुरंदर परिसरात मागील दोन दिवसांत अतिवृष्टीने व महापुराने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे त्या भागातील नुकसानाची पाहणी करण्यासाठी आणि जनतेला दिलासा देण्यासाठी मी तातडीने पुण्याला जात आहे, याची कृपया नोंद घ्यावी असं शरद पवारांनी स्पष्ट केले आहे. ईडीच्या कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी शरद पवार मुंबईत होते. मात्र पोलिसांच्या विनंतीनुसार ईडी कार्यालयात जाणार नसल्याचे सांगितले. त्यानंतर शरद पवार मुंबईहून पुण्याला तात्काळ रवाना झाले आहेत.
पुणे शहर व जिल्ह्यातील बारामती, पुरंदर परिसरात मागील दोन दिवसांत अतिवृष्टीने व महापुराने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असल्याने त्या भागातील नुकसानाची पाहणी करण्यासाठी आणि जनतेला दिलासा देण्यासाठी मी तातडीने जात आहे, याची कृपया नोंद घ्यावी.
— Sharad Pawar (@PawarSpeaks) September 27, 2019
पुणे शहरातील ओढे आणि पुरंदर, बारामतीमधून वाहणाऱ्या कऱ्हा नदीने रौद्र रुप धारण केल्याने उडालेल्या हाहाकारात १५ जणांचा बळी गेला. ८ जण वाहून गेल्याने बेपत्ता आहेत. ९००च्यावर जनावरेही मृत्युमुखी पडली असून हजारो वाहनांचे नुकसान झाले आहे. बुधवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास मुसळधार पावसाला सुरूवात झाली होती. कात्रज तलाव साखळीतील तीनही तलावांच्या परिसरात अतिवृष्टी झाली. त्यामुळे आंबिल ओढ्याला प्रचंड पूर आला. कात्रजपासून ते जनता वसाहतपर्यंतच्या संपूर्ण परिसरातील घरांना पुराच्या पाण्याने वेढले. सुमारे आठ ते दहा फूट पाणी वाहत होते. यामध्ये ओढ्यासह अनेक सोसायट्यांच्या संरक्षक भिंती कोसळल्याने शेकडो वाहने वाहून गेले. पुणे शहरासह जिल्ह्यातील ५ तालुक्यांना मुसळधार पावसाचा फटका बसला आहे.