रद्द तिकिटाचा आता पूर्ण परतावा मिळणार; शुल्काच्या भुर्दंडापासून प्रवाशांची सुटका होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2023 11:06 AM2023-03-27T11:06:55+5:302023-03-27T11:07:08+5:30
पेटीएमने आपल्या मोबाइल ॲपवर ‘कॅन्सल प्रोटेक्ट’ ही सुविधा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई : रेल्वे प्रवासाच्या तिकिटाचे आरक्षण केल्यानंतर काही कारणास्तव तिकीट रद्द केल्यास रद्द करण्याचे शुल्क कपात करून उर्वरित रक्कम प्रवाशांच्या खात्यात जमा होते. तिकीट रद्द करण्याच्या शुल्काच्या भुर्दंडापासून प्रवाशांची आता सुटका होणार आहे.
पेटीएमने आपल्या मोबाइल ॲपवर ‘कॅन्सल प्रोटेक्ट’ ही सुविधा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या सुविधेंतर्गत प्रवाशांना तिकिटांच्या पूर्ण रकमेचा परतावा मिळणे शक्य होणार आहे. रेल्वे नियोजित वेळेत सुटण्याच्या सहा तास आधी किंवा तिकिटांचा तक्ता तयार होण्याच्या आधी, यापैकी जे आधी असेल अशा पेटीएमद्वारे रद्द केलेल्या तिकिटांचा १०० टक्के परतावा प्रवाशांना मिळणार आहे.