"गारगाई धरण प्रकल्प रद्द करत समुद्राचे पाणी पिण्यायोग्य करुन पाजणे हा सरकार, महापालिकेचा वेडेपणा" 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2021 06:40 AM2021-12-14T06:40:28+5:302021-12-14T06:41:01+5:30

विषयाचे आकलन नसल्याने धरणच रद्द करण्याचा केलेला हा अविचार, डॉ. माधव चितळे यांचं मत. मुंबई महानगराला सतावतेय पाणीटंचाई

"Canceling the Gargai Dam project and making the sea water drinkable is the madness of the government, the Municipal Corporation" | "गारगाई धरण प्रकल्प रद्द करत समुद्राचे पाणी पिण्यायोग्य करुन पाजणे हा सरकार, महापालिकेचा वेडेपणा" 

प्रातिनिधीक छायाचित्र

googlenewsNext

संदीप प्रधान

मुंबई महानगर प्रदेशातील अनेक शहरे पाणीटंचाईचा सामना करीत असताना गारगाई धरण प्रकल्प रद्द करून लोकांना समुद्राचे खारे पाणी पिण्यायोग्य करून पाजणे हा सरकार व महापालिकेचा वेडेपणा आहे, अशी रोखठोक टीका जलतज्ज्ञ डॉ. माधव चितळे यांनी ‘लोकमत’कडे केली. विषयाचे आकलन नसल्याने धरणच रद्द करण्याचा केलेला हा अविचार आहे. वृक्षतोड टाळून पर्यावरणाची हानी टाळली, असे सरकार सांगत असले तरी समुद्राच्या पाण्यातील क्षार किनाऱ्यावर काढून पाणी पिण्यायोग्य करण्यामुळे किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणावर क्षार तयार होऊन समुद्रकिनाऱ्यालगतच्या जैवविविधतेची हानी होणार आहे, याकडे चितळे यांनी लक्ष वेधले.

मुंबई महानगर प्रदेशातील वाढत्या पाणीपुरवठ्याकरिता मुंबई महापालिकेने नव्वदच्या दशकात डॉ. चितळे समिती नियुक्त केली होती. समितीने मध्य वैतरणा, गारगाई, पिंजाळ, पोशिर वगैरे धरणांच्या उभारणीचा कृती आराखडा महापालिकेला तयार करून दिला होता. 

त्यानुसार पालघर जिल्ह्यातील गारगाई नदीवर धरण बांधण्याची तयारी महापालिकेने केली होती. मात्र, या प्रकल्पाकरिता साडेचार लाख झाडांची कत्तल करावी लागणार असल्याने पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनंतर महापालिकेने हा प्रकल्प गुंडाळण्याचे ठरवले आहे. पर्यायी वृक्षलागवडीकरिता चंद्रपूर येथे जमीन संपादित करण्याची प्रक्रिया महापालिकेने सुरू केली होती. मुंबईकरांची वाढती पाण्याची गरज भागवण्याकरिता दररोज ४०० दशलक्ष लीटर समुद्राचे पाणी पिण्यायोग्य करून वितरित केले जाणार आहे.

त्यावर डॉ. चितळे म्हणाले की, पर्यावरणीयदृष्ट्या हा चांगला पर्याय नाही. समुद्राचे पाणी पिण्यायोग्य करताना त्या पाण्यातील क्षार काढून आपण समुद्रकिनारी टाकणार आहोत. पर्यायाने किनारपट्टीवरील क्षार वाढणार. त्याचा विपरीत परिणाम किनारपट्टीवरील जैवविविधतेवर होणार आहे. त्यापेक्षा पावसाचे पडणारे पाणी धरणात साठवून ठेवणे हे सुज्ञपणाचे लक्षण आहे. धरणामुळे बुडणारे क्षेत्र हे कमी आहे. झाडे लावण्याकरिता आजही बरीच मोकळी जमीन उपलब्ध आहे. पावसाचे पाणी साठवण्यामुळे भूजल पातळीही वाढते. युरोप, अमेरिकेतील पर्यावरणीय अभ्यासांवर विसंबून राहून जर आपण धोरणे ठरवू लागलो तर फसगत होण्याची दाट शक्यता असते, असा टोला त्यांनी लगावला.

आपल्याकडे पावसाळी हंगामात १५ ते २० दिवस पडणाऱ्या पावसाचे पाणी आपण साठवले नाही तर आपली समृद्धी अशक्य आहे. साठवलेले पाणी कशा पद्धतीने द्यायचे हे नंतर ठरवता येते. गेल्या काही वर्षांत आपले राहणीमान उंचावले असल्याने पाण्याचा वापर वाढला आहे. कोरोनामुळे आरोग्याच्या, स्वच्छतेच्या अपेक्षा वाढल्या आहेत. त्यामुळे पावसाचे पाणी साठवणे अपरिहार्य आहे. धरणे बांधल्यास त्याद्वारे वीजनिर्मिती करता येते. त्यामुळे कोळसा व अणुच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या ऊर्जानिर्मितीवरील भार कमी होतो. कोळसा व अणुचा वापर करून ऊर्जानिर्मिती करणे हेही पर्यावरणाला घातक आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

Web Title: "Canceling the Gargai Dam project and making the sea water drinkable is the madness of the government, the Municipal Corporation"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.