जलवाहिनीचे अडीचशे टक्के अधिक दराने दिलेले कंत्राट रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2020 02:29 AM2020-03-04T02:29:19+5:302020-03-04T02:29:24+5:30
मात्र ही धक्कादायक बाब समोर आल्यानंतर या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश प्रशासनाने दिले. त्यानुसार हे कंत्राट रद्द करण्यात आले
मुंबई : दोन वर्षांपूर्वी रद्द केलेल्या कामासाठी तब्बल अडीचशे टक्के रक्कम अधिक मोजण्याची तयारी महापालिकेने केली होती. मात्र
ही धक्कादायक बाब समोर आल्यानंतर या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश प्रशासनाने दिले. त्यानुसार हे कंत्राट रद्द करण्यात आले
असून, यामुळे ३१ कोटी रुपयांची बचत झाली आहे. जलवाहिन्यांच्या एपोक्सी पेंटिंगचे काम एपीआय सिव्हिल या कंपनीला
मिळाले होते. सन २०१८ मध्ये जेव्हा हे काम देण्यात येणार होते, तेव्हा कामाची किंमत दोन कोटी ६० लाख रुपये होती. मात्र हे काम काही
कारणास्तव पालिकेने रद्द केले. त्यानंतर त्याच कामात सुधारणा करीत पालिका प्रशासनाने ४४.८१ कोटींची निविदा सप्टेंबर २०१९ मध्ये काढली. मात्र हे कामदेखील त्याच कंपनीला देण्यात आले. यामध्ये कोटिंग, वाहिन्यांची सफाई अशा काही नवीन कामांचा समावेश होता. फक्त १८ महिन्यांमध्ये पूर्वीच्या दरात आणि नवीन दरात अडीचशे टक्क्यांनी वाढ झाल्यामुळे या व्यवहारावर संशय व्यक्त होऊ लागला. पूर्वीच्या आणि नवीन दरातील तफावतीमुळे महापालिका प्रशासनाला ३१ कोटींचा भुर्दंड बसणार होता.
याबाबत तक्रार आल्यानंतर प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश मुख्य अभियंता(दक्षता) यांना दिले होते. या प्रकरणाबाबत माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी माहितीच्या अधिकारात विचारले असता, या कामाची निविदा तांत्रिक कारणामुळे रद्द करण्यात आलेली आहे. कोणत्याही कंपनीला कार्यादेश देण्यात आलेला नाही, असे जल अभियंता खात्याने सांगितले.
>१८५ ऐवजी ४६३ रुपयांचा दर
यापूर्वी ३० टक्के कमी किमतीत काम करण्यास तयार असणारा ठेकेदार दुसऱ्या वेळेस एकूण रकमेच्या दोन टक्के कमी किमतीत काम करणार होता. पण यामध्ये पूर्वीच्या १८५ रुपये दराऐवजी कामाची किंमत ४६३ रुपयांनी वाढली. यामुळे एकूण ६४८ रुपये मोजावे लागणार होते. परिणामी, पालिका प्रशासनाला ३१ कोटी रुपयांचा भुर्दंड बसणार होता.