अवैधरित्या मद्यपुरवठा करणाऱ्या मुंबईतील ६ अनुज्ञप्तीधारकांच्या अनुज्ञप्ती रद्द

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2019 07:59 PM2019-10-04T19:59:01+5:302019-10-04T20:07:37+5:30

राज्य उत्पादन शुल्क आयुक्त प्राजक्ता लवंगारे - वर्मा यांची माहिती

Cancellation of license for 6 illegal liquor supplier in Mumbai | अवैधरित्या मद्यपुरवठा करणाऱ्या मुंबईतील ६ अनुज्ञप्तीधारकांच्या अनुज्ञप्ती रद्द

अवैधरित्या मद्यपुरवठा करणाऱ्या मुंबईतील ६ अनुज्ञप्तीधारकांच्या अनुज्ञप्ती रद्द

Next
ठळक मुद्देसर्व राज्य उत्पादन शुल्क अधिकारी व कर्मचारी यांना याबाबत सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.६ अनुज्ञप्तीधारकांच्या अनुज्ञप्ती रद्द करण्यात आल्या आहेत. मुंबईमध्ये नियमभंग करणाऱ्या काही अनुज्ञप्तीधारकांवर कडक कारवाई करण्यात आली.

मुंबई -  विधानसभा निवडणुका निर्भिड व खुल्या वातावरणात पार पडण्याकरिता राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फतमुंबईमध्ये नियमभंग करणाऱ्या काही अनुज्ञप्तीधारकांवर कडक कारवाई करण्यात आली. ६ अनुज्ञप्तीधारकांच्या अनुज्ञप्ती रद्द करण्यात आल्या आहेत. यापुढेही अवैधरित्या मद्यपुरवठा करणाऱ्या अथवा नियमभंग करणाऱ्या अनुज्ञप्तींविरोधात अनुज्ञप्‍ती रद्द अथवा निलंबनाची कठोर कारवाई करण्याचा इशारा राज्य उत्पादन शुल्क आयुक्त प्राजक्ता लवंगारे - वर्मा यांनी दिला आहे. सर्व राज्य उत्पादन शुल्क अधिकारी व कर्मचारी यांना याबाबत सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

निवडणूक आचारसंहिता नियमांचा तसेच मुंबई विदेशी मद्य नियमावली 1953 अंतर्गत नियमांचा भंग करणाऱ्या व अवैधरित्या मद्यविक्री करणाऱ्या मुंबई उपनगर जिल्ह्यातील वैशाली वाईन्स, व्हरायटी वाईन्स या एफएल-II अनुज्ञप्तीविरुध्द कठोर पाउले उचलून या अनुज्ञप्ती रद्द करण्यात आल्या आहेत. अवैधरित्या मद्यपुरवठा करणाऱ्या वैशाली वाईन्स या अनुज्ञप्तीसोबत अवैध मद्याचा पुरवठा होणाऱ्या हॉटेल किनारा या एफएल-III अनुज्ञप्तीचाही परवाना रद्द करण्यात आला आहे. तसेच मुंबई विदेशी मद्य नियमावली 1953 अंतर्गत अटी व शर्थींचे पालन न करणाऱ्या शशी लंच होम, हॉटेल स्वस्तिक या एफएल-III अनुज्ञप्ती निवडणूक कालावधी संपेपर्यंत निलंबित करण्यात आल्या आहेत. 24 लाँज बार, प्लॅटिनम बार, शिवलीला बार, जरना हॉटेल एफएल – III अनुज्ञप्ती ह्या 08 ते 15 दिवसांकरिता निलंबित करण्यात आल्या आहेत. मुंबई उपनगर जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर यांच्या आदेशान्वये मुंबई उपनगर जिल्ह्याच्या अधीक्षक स्नेहलता श्रीकर, निरीक्षक मनोज चौधरी यांच्यामार्फत ही कार्यवाही करण्यात आली.

निवडणूकीदरम्यान जिल्ह्यात अनुचित प्रकार घडू नये यासाठी एफएल-II, एफएल-III व सीएल -III इ. मद्यविक्री करणाऱ्या अनुज्ञप्तींवर सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ऑनलाईन पध्दतीने मद्यविक्रीची माहिती भरणे, विहीत वेळेत मद्य अनुज्ञप्ती उघडणे व बंद करण्याच्या वेळा कसोशिने पाळणे, मद्य विक्रीच्या नोंदवह्या व मद्यसाठा अद्यावत ठेवणे याबाबत जिल्ह्यातील सर्व अनुज्ञप्तीधारकांस निर्देश देण्यात आलेले आहेत.

अवैध मद्यविक्रीविरोधी तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक

नागरिकांनी अवैध मद्यविक्री विरोधात काही तक्रार असल्यास राज्य उत्पादन शुल्क विभागाचा टोल फ्री क्र. 18008333333 व व्हॉटसअ‍ॅप क्रमांक-8422001133 वर संपर्क साधावा, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क आयुक्त प्राजक्ता लवंगारे - वर्मा यांनी केले आहे. तसेच सर्व अनुज्ञप्तीधारकांनी राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत सुरु करण्यात आलेल्या SCM (E) BOOK या अप्लिकेशनचा वापर करुन दैनंदिन मद्यविक्रीची माहिती भरण्यात यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

Web Title: Cancellation of license for 6 illegal liquor supplier in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.