Join us  

कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2024 5:28 AM

सोमवारपर्यंत अंमलबजावणी न करण्याचे न्यायालयाचे निर्देश

मुंबई : गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्था अभिमत विद्यापीठाच्या कुलगुरुपदी केलेली नियुक्ती रद्द करण्याच्या निर्णयाला अर्थशास्त्रज्ञ आणि राजकीय विश्लेषक डॉ. अजित रानडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. न्यायालयाने सोमवारपर्यंत निर्णयाची अंमलबजावणी न करण्याचे निर्देश देऊन डॉ. रानडे यांना तात्पुरता दिलासा दिला आहे.

डॉ. रानडे यांची नियुक्ती यूजीसीच्या निकषांनुसार झाली नसल्याचे म्हणत पुण्याच्या प्रसिद्ध गोखले अभिमत विद्यापीठाने डॉ. रानडे यांची कुलगुरू म्हणून केलेली नियुक्ती काही दिवसांपूर्वी रद्द केली. या निर्णयाला रानडे यांनी बुधवारी उच्च न्यायालयात आव्हान दिले.  नियमित खंडपीठ नसल्याने न्या. महेश सोनक व न्या. कमल खाटा यांच्या खंडपीठाने सुनावणी घेण्यास नकार दिला. मात्र, रानडे यांना तात्पुरता दिलासा दिला. २३ सप्टेंबरपर्यंत विद्यापीठाने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करू नये, असे निर्देश न्यायालयाने दिले; तर गोखले विद्यापीठासह अन्य प्रतिवाद्यांना त्यांची २१ सप्टेंबरपर्यंत याचिकेवर उत्तर देण्याचे निर्देश न्यायालयाने दिले.