पोलिसांच्या ‘दक्षता’ मासिकाचे ‘आउटसोर्सिंग’ रद्द
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2020 07:08 AM2020-01-19T07:08:09+5:302020-01-19T07:08:31+5:30
राज्य पोलीस दलाकडून काढण्यात येणाऱ्या ‘दक्षता’ मासिकाचे गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेले ‘आउटसोर्सिंग’ बंद करण्यात आले आहे.
- जमीर काझी
मुंबई : राज्य पोलीस दलाकडून काढण्यात येणाऱ्या ‘दक्षता’ मासिकाचे गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेले ‘आउटसोर्सिंग’ बंद करण्यात आले आहे. त्यामुळे सध्याच्या संपादकीय सल्लागार मंडळाची जबाबदारी आता निवृत्त सरकारी अधिकाºयावर सोपविली जाणार आहे. गेली तीन वर्षे दक्षताचे काम पाहत असलेल्या सल्लागारांना दर महिन्याला तीन लाख रुपयांचे मानधन देण्यात येत होते. हे काम आता सेवा करार पद्धतीने निवृत्त अधिकाºयाला देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
महाराष्टÑ पोलीस दलाप्रमाणेच मुख्यालयाकडून प्रकाशित करण्यात येणा-या दक्षता मासिकाची मोठी परंपरा आहे. गेल्या ४७ वर्षांपासून खात्यातील अद्ययावत घडामोडी, उत्कृष्ट गुन्हे तपास कथा, अधिकारी-अंमलदारांची कामगिरी त्यामध्ये छापण्यात येते. काळानुरूप त्याची मांडणी, सजावट व आकारामध्येही बदल होत राहिला. पदसिद्ध पोलीस महासंचालक आणि नियोजन व तरतूद विभागाचे अप्पर महासंचालक यांचे मार्गदर्शन तसेच साहाय्यक महानिरीक्षक यांच्या संपादनाखाली दर महिन्याला मासिक प्रकाशित करण्यात येत होते. मात्र २०१७ पासून अचानकपणे मासिकातील मजकूर आणि मांडणी पोलीस खात्याबाहेरील अनुभवी मंडळीकडून करून घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
पोलीस महासंचालकांनी डिसेंबरपासून दक्षता मासिकाचे हे आउटसोर्सिंग बंद केले आहे. सध्या महासंचालक कार्यालयात कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून मासिकाचे काम करून घेतले जात आहे. सल्लागार म्हणून शासकीय व निमशासकीय निवृत्त अधिकाºयाकडे मानधन तत्त्वावर ही जबाबदारी सोपविली जाणार आहे.
सल्लागाराची लवकरच नियुक्ती
दक्षता मासिकाचे सल्लागार म्हणून माध्यमातील कामाचा अनुभव असलेल्या व्यक्तीवर सेवा करार पद्धतीने जबाबदारी सोपविली जाणार आहे. त्यासाठी संबंधित विभागाकडून इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत. लवकरच नियुक्ती करून दक्षता मासिक दर्जेदार व लौकिकाला साजेसे काढण्यात येईल.
- सुबोध जायसवाल,
पोलीस महासंचालक