Join us

आरक्षण केंद्रांवरील तिकीट आॅनलाइन रद्द करता येणार?

By admin | Published: December 30, 2015 1:26 AM

तिकीट खिडक्यांवर जाऊन काढण्यात आलेले (पीआरएस) मेल-एक्स्प्रेस गाड्यांचे आरक्षित तिकीट संकेतस्थळावरूनही रद्द करता येणे शक्य होणार आहे. रेल्वेच्या क्रिस संस्थेकडून (सेंटर फॉर रेल्वे

मुंबई : तिकीट खिडक्यांवर जाऊन काढण्यात आलेले (पीआरएस) मेल-एक्स्प्रेस गाड्यांचे आरक्षित तिकीट संकेतस्थळावरूनही रद्द करता येणे शक्य होणार आहे. रेल्वेच्या क्रिस संस्थेकडून (सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टीम) या नवीन सेवेवर काम करण्यात येत आहे. सध्या अनेक तांत्रिक बाबी सोडवण्यावर भर दिला जात असल्याची माहिती क्रिसचे मुंबई विभागीय महाव्यवस्थापक उदय बोभाटे यांनी सांगितले. तिकीट खिडक्यांवर मेल-एक्स्प्रेसचे आरक्षित तिकीट काढल्यानंतर काही कारणास्तव तिकिट रद्द करण्यासाठी प्रवाशांना पुन्हा स्थानकापर्यंत यावे लागते. रेल्वेच्या आॅनलाइन सेवेत असे तिकीट रद्द करण्याची सुविधा नाही. संकेतस्थळावरून आरक्षित केलेले तिकीटच आॅनलाइन रद्द करण्याची सुविधा आहे. तिकीट खिडक्यांवरून तिकीट आरक्षित केलेल्या प्रवाशांची ही अडचण सोडवण्यासाठी रेल्वेच्या क्रिस संस्थेकडून हे पाऊल उचलण्यात आले आहे. या सुविधेबाबतची चाचपणी सध्या केली जात आहे. रद्द केलेल्या तिकिटाची रक्कम पुन्हा प्रवाशांना मिळणे, तिकीट काढलेल्या प्रवाशाने तिकीट रद्द केल्याची खातरजमा करण्यासाठी तांत्रिक बाबी पडताळून पाहिल्या जात आहेत. सध्या स्थानकांवरील आरक्षण केंद्रावरून काढण्यात येणाऱ्या तिकिटांसाठी फोन नंबर भरणे आवश्यक नसते. मात्र ही माहिती नवीन सुविधेत भरणे आवश्यक असेल, असे ते म्हणाले.