गरम नारळपाणी प्यायल्याने कर्करोग बरा होत नाही! व्हायरल मेसेजवर स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2019 02:36 AM2019-05-18T02:36:06+5:302019-05-18T02:36:15+5:30
नारळपाणी गरम करून प्यायल्याने कर्करोगाचा व ट्युमरचा समूळ नाश होत असल्याचे मेसेजमध्ये म्हटले आहे; मात्र हा दावा चुकीचा आहे.
मुंबई : सोशल मीडियावर मागील काही दिवसांपासून नारळपाणी उकळून प्यायल्यास कुठल्याही प्रकारचा कर्करोग बरा होत असल्याचा परळ येथील टाटा कर्करोग रुग्णालयाचे संचालक डॉ. राजेंद्र बडवे यांच्या नावे मेसेज व्हायरल होत आहे. हा संदेश चुकीचा असल्याचा खुलासा टाटा रुग्णालय प्रशासनाने प्रसिद्धिपत्रकाद्वारे केला आहे.
टाटा कर्करोग रुग्णालयाचे संचालक डॉ. राजेंद्र बडवे यांनी यासंदर्भात प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, टाटा कर्करोग रुग्णालय वा माझ्या नावे सोशल मीडियावर व्हायरल होणारा संदेश खोटा आहे. नारळपाणी गरम करून प्यायल्याने कर्करोगाचा व ट्युमरचा समूळ नाश होत असल्याचे मेसेजमध्ये म्हटले आहे; मात्र हा दावा चुकीचा आहे. याविषयी कुठल्याही प्रकारचे संशोधन झालेले नाही. त्यामुळे सामान्य नागरिकांनी अशा कोणत्याही प्रकारच्या संदेश वा पोस्टची विश्वासार्हता पडताळल्याशिवाय त्यावर विश्वास ठेवू नये किंवा तो फॉरवर्ड करू नये.
यापूर्वी टाटा रुग्णालयाच्या नावे अशा प्रकारे व्हायरल झालेल्या अनेक पोस्टमुळे कर्करोगाविषयी चुकीचे समज पसरत असल्याचे उघड झाले आहे. टाटा रुग्णालयाचे डॉ. मकरंद देशपांडे यांच्या नावेही असा चुकीचा संदेश व्हायरल झाला होता; मात्र या नावाचे कुणीही डॉक्टर रुग्णालयाशी संलग्न नसून ती माहिती चुकीची असल्याचा खुलासा रुग्णालय प्रशासनाने त्या वेळी केला होता.