कर्करुग्णांनी प्राधान्याने लसीकरण करणे आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:06 AM2021-07-07T04:06:52+5:302021-07-07T04:06:52+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कर्करुग्णांना कोरोना विषाणूची लागण होण्याचा धोका अधिक आहे. शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती या रुग्णांमध्ये कमी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कर्करुग्णांना कोरोना विषाणूची लागण होण्याचा धोका अधिक आहे. शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती या रुग्णांमध्ये कमी असल्याने त्यांना हा आजार होऊ शकतो. बऱ्याचदा मृत्यू होण्याचीही शक्यता असते. अशा स्थितीत कोरोना विषाणूची लागण होण्यापासून वाचण्यासाठी कर्करुग्णांनी घाबरून न जाता वेळेवर लसीकरण करून घेणे आवश्यक आहे, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
आयसीएमआरच्या अहवालानुसार आणि बंगलोर येथील नॅशनल सेंटर फाॅर डिसीज इन्फाॅर्मेटिक्स अँड रिसर्चनुसार, भारतात २०२० या वर्षात ६,७९,४२१ पुरुषांना कर्करोगाची लागण झाल्याचे समोर आले आहे. २०२५ पर्यंत या आकडेवारीत वाढ होऊन ती ७,६३,५७५ वर पोहोचू शकते. पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये कर्करुग्णांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे कर्करोगाचे वेळीच निदान आणि उपचार होणे गरजेचे आहे, अन्यथा आजार वाढू शकतो. सध्या कोरोनामुळे अनेक कर्करोगग्रस्त रुग्णालयात जाऊन उपचार घेण्यास टाळाटाळ करीत आहेत. यामुळे आजार वाढल्यास डॉक्टरांना उपचार करणेही अवघड होते.
एसीआय कंबाला हिल हॉस्पिटलचे डॉ. सुहास आगरे म्हणाले, कर्करुग्णांची रोगप्रतिकारक क्षमता कमी असल्याने त्यांना कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. कर्करोगावरील उपचारात केमोथेरपीमुळे रुग्णांमध्ये पुरेशी ताकद नसते. कर्करोगाचे अधिक रुग्ण वृद्ध आहेत, जे कोविडसाठी एक जोखीम घटक आहेत. फुप्फुसाचा कर्करोग असलेल्या लोकांना कोरोना संसर्गाचा धोका जास्त असतो. कारण या रुग्णांची फुप्फुस आधीच कमकुवत झालेली असतात. इतकेच नाहीतर कर्करोगाचा परिणाम फुप्फुस किंवा मूत्रपिंडाच्या कार्यावर होतो. कोरोनामुळे अवयवदान कमी होत असल्याने अवयवांची गरज असलेल्या रुग्णांना ताटकळत राहावे लागत आहे.