मुंबई - गेल्या काही वर्षात कर्करोगाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे या आजाराला प्रतिबंध करण्यासाठी आरोग्य यंत्रणांनी विविध उपाययोजना राबवण्यास सुरुवात केली आहे. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे राज्यातील आठ जिल्ह्यांत कर्करोग तपासणी करिता डायग्नोस्टिक कॅन्सर व्हॅन कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्याकरिता सार्वजनिक विभागाने ७९ लाख रुपयांच्या खर्चास मान्यता दिली आहे.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मोबाइल कॅन्सर तपासणी व्हॅन ही सेवा कंत्राटी स्वरूपात राबवण्यात येणार आहे.तसेच, या गाड्या संपूर्ण जिल्ह्यात तपासणीसाठी फिरणार असल्याने त्याकरिता लागणारे पेट्रोल आणि इतर खर्च मान्यता मिळालेल्या निधीतून करण्यात येणार आहे.या गाडीमध्ये नागरिकांची कॅन्सरच्या अनुषंगाने तपासणी करण्यात येणार आहे. या तपासणीत एखाद्याला हा आजार झाल्याचे आढळून आल्यास त्यांना पुढील उपचाराकरिता जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात येणार आहे.
प्रतिबंधासाठीही कंबर कसलीकॅन्सरच्या प्रतिबंधासाठी आणि उपचारासाठी सार्वजनिक आरोग्य यंत्रणांनी कंबर कसली आहे. त्यामुळे गरीब रुग्णांना काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे. दरवर्षी भारतात १५ लाख कर्करुग्ण आढळतात. त्यापैकी सुमारे ८ लाख लोकांचा मृत्यू होतो. येत्या काही वर्षांत हे प्रमाण २१ लाखांपर्यंत जाण्याची भीती आहे. त्यामुळे कर्करोगावर योग्य वेळी योग्य उपचार होणे आवश्यक आहे. यासाठी राज्य सरकारने जागतिक कर्करोग दिनानिमित्त तपासणी मोहीम सुरू केली आहे.
महापालिकाही सज्जमुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पातही कॅन्सर उपचारांवर लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. त्यानुसार नायर रुग्णालयात स्वतंत्र कॅन्सर उपचार विभागाचे काम सुरू करण्यात आले आहे. कूपर रुग्णालयात कॅन्सरसाठी १५० बेड्सचा स्वतंत्र वॉर्ड तयार करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे त्या ठिकाणी लिनियर एक्सिलिरेटर या अत्याधुनिक यंत्रांची व्यवस्था करण्यात येणार आहे. सायन रुग्णालयातही कर्करोग उपचारांसाठी स्वतंत्र इमारतीचे काम सुरू होणार आहे.