मुंबई: जे जे रुग्णालयाच्याअखत्यारीत येणाऱ्या कामा रुग्णालयात केवळ महिला आणि मुलांसच्या आजारावरील उपचार देण्यात येतात. या रुग्णालयात महिलांच्या कॅन्सर वर सुद्धा उपचार देण्यात येत होते. मात्र या उपचाराचा भाग असणारे लिनिर अक्सीलेटर दीड वर्षांपूर्वी बंद पडले होते. त्यामुळे रुग्णांना रेडिएशन देता येत नव्हते. मात्र वैद्यकीय शिक्षण विभागाने नवीन लिनिर अक्सीलेटर घेण्यास परवानगी दिल्याने आता पुन्हा कॅन्सरवरील रुग्णांना उपचार मिळण्यास सुरुवात होणार आहे. त्यासाठी विभागाने ३८ कोटी रुपयाची मंजुरी दिली आहे.
कॅन्सरच्या रुग्णांची संख्या गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कारण अनेक ठिकाणी या आजराचे निदान होऊ लागले आहे. मात्र निदानानंतर या आजरावरील उपचारासाठी अनेकवेळा रेडिएशनची गरज भासते. टाटा रुग्णालया व्यतिरिक्त अन्य ठिकाणी या उपचारासाठी मोठा खर्च येतो. मात्र टाटा रुग्णालयात आजही देशभरातून रुग्ण उपचारासाठी येत असतात. तसेच त्या ठिकाणी उपचार घेणाऱ्या रुग्णाची मोठी गर्दी असते. अनेकवेळा रुग्णांना त्या ठिकाणी उपचारासाठी ताटकळत बसावे लागते.
महिलांमध्ये प्रामुख्याने स्तनाचा कर्करोग आणि गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर आढळून येतो. कामा रुग्णालयात या आजरावर १० ते १५ वर्षांपासून उपचार करण्यात येत होते. मात्र दीडव वर्षांपासून रेडिएशन देणारे यंत्र बंद पडल्यामुळे रुग्णांना हे उपचार या ठिकाणी मिळत नव्हते. आता शासनाने नवीन मशीन खरेदी करण्याच्या खर्चास मंजुरी दिल्यामुळे आता या रुग्णालयात पुन्हा कॅन्सरवरील आजराचे उपचार सुरु होणार आहे.