Join us

सलग सुट्ट्यांमुळे मतदान कमी होईल का? उमेदवारांना चिंता : तरुणांना प्रोत्साहन द्या !

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2024 10:49 AM

मुंबईत सोमवार, २० मे रोजी मतदान होणार आहे. शनिवार, रविवारला जोडून मतदानाचा दिवस असल्याने तीन दिवस सलग सुट्ट्या मिळतात.

मुंबई :मुंबईत सोमवार, २० मे रोजी मतदान होणार आहे. शनिवार, रविवारला जोडून मतदानाचा दिवस असल्याने तीन दिवस सलग सुट्ट्या मिळतात. त्याचा परिणाम मतदानावर होऊ नये, अशी चिंता विविध राजकीय पक्षांना लागली आहे. त्याचेच प्रतिबिंब माहीम विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या दादर येथे झालेल्या महायुतीच्या निर्धार मेळाव्यात उमटले.

ऐन उन्हाळा आणि सुट्ट्यांच्या कालावधीत यंदा लोकसभेसाठी निवडणूक होत आहे. मतदार गावी गेल्यास मतदानाची टक्केवारी घटून त्याचा फटका बसू नये, याची काळजी घेण्याच्या सूचना महायुतीच्या निर्धार मेळाव्यात शिंदेसेनेचे मुंबई दक्षिण-मध्यचे उमेदवार राहुल शेवाळे यांनी कार्यकर्त्यांना दिल्या.

‘मतदानाची टक्केवारी वाढली की विजयाचा मार्ग सुकर होतो. त्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढविण्यावर भर द्या. नवमतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करा तसेच निवडणुकीवेळी मतदार गावी जाणार नाहीत यासाठी प्रयत्न करा,’ अशाही सूचना शेवाळे यांनी कार्यकर्त्यांना दिल्या. यावेळी आमदार सदा सरवणकर, आमदार प्रसाद लाड, भाजप जिल्हाध्यक्ष राजेश शिरवाडकर, शिंदे सेनेचे विभागप्रमुख निशिकांत पाठारे यांच्यासह शिंदेसेना, भाजप, रिपाइं (आठवले गट) यांचे पदाधिकारी उपस्थित होते.

१) ‘उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्कमध्ये हिंदुत्वाची आहुती दिली,’ अशी टीका शिंदेसेनेचे नेते आ. सरवणकर यांनी केली. तर, ‘नरेंद्र मोदी यांच्यासारखा जागतिक कीर्तीचा नेता लाभला आहे. 

२) बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न मोडण्याचे काम उद्धव ठाकरे यांनी केले,’ अशी टीका आ. प्रसाद लाड यांनी केली.

‘विकसित मुंबई ते विकसित भारत’-

मुंबईची पाणी समस्या, पर्यावरण, शिक्षण आदी प्रश्नांचे उत्तर मुंबईच्या विकास आराखड्यात आहे. या आराखड्याची संपूर्ण अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. त्यामुळेच विकसित मुंबई २०३४ चा संकल्प घेतला असून निवडणुकीसाठी ‘विकसित मुंबई ते विकसित भारत’ ही घोषणा असेल, असेही शेवाळे यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितले.

टॅग्स :मुंबईलोकसभा निवडणूक २०२४