लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबई पोलिस दलासाठी सुरू असलेल्या भरती प्रक्रियेमध्ये एका २६ वर्षीय उमेदवाराने मैदान पूर्ण करत प्राण सोडल्याने शुक्रवारी खळबळ उडाली. गणेश उगले असे मृत उमेदवाराचे नाव असून १६०० मीटर धावण्याची चाचणी पूर्ण केली आणि तो खाली कोसळला. यातच त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी वांद्रे-कुर्ला संकुल पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.
मूळचा वाशिम जिल्ह्यातील रहिवासी असलेला उगले मुंबई पोलिस दलातील शिपाई भरती प्रक्रियेत चुलत भावाबरोबर सहभागी झाला होता. शुक्रवारी सकाळी तो कलिना विद्यापीठाच्या मैदानावर चाचणीसाठी उतरला. त्याने १६०० मीटरची चाचणी पूर्ण केली आणि अंतिम रेषा ओलांडल्यानंतर लगेचच जमिनीवर कोसळला. भरती प्रक्रियेसाठी उपस्थित असलेल्या वैद्यकीय पथकाने तात्काळ त्याला उपचारांसाठी सांताक्रूझ येथील व्हीएन देसाई रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. या घटनेने सर्वांनाच धक्का बसला. पोलिसांनी उगले याच्या चुलत भावाकडे चाैकशी केली असता, त्याने कोणत्याही अस्वस्थतेची तक्रार केली नव्हती, असे समजले.