उपनिरीक्षक पदाच्या उमेदवारांचा जीव टांगणीला; मुख्य परीक्षेसाठी 'रेशो' तातडीने वाढवण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2023 01:07 PM2023-08-29T13:07:13+5:302023-08-29T13:08:32+5:30
सरकारच्या चुकीचा विद्यार्थ्यांना फटका कशाला?
मुंबई : राज्य लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) उपनिरीक्षकपदासाठी तातडीने रेशो वाढवण्याची मागणी उमेदवार करत आहेत. यापूर्वीच्या गट ब पूर्व परीक्षेमध्ये विविध पदांसाठी २२ पट पर्यंत उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र करण्यात आले आहेत. याउलट संयुक्त गट ब परीक्षा २०२२ पोलीस उपनिरीक्षक मुख्य परीक्षेसाठी केवळ १६.६४ पटच उमेदवार पात्र करण्यात आले आहेत. या १६.६४ पट उमेदवारांमध्ये विविध पदांवर नियुक्तीस पात्र ठरलेले उमेदवारही आहेत.
मुख्य परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात झाल्याने एमपीएससीने याबाबत येत्या ३० ऑगस्टपर्यंत निर्णय घ्यावा, अशी कळकळीची विनंती पूर्व परीक्षेत पात्र ठरलेले उमेदवार करत आहेत. एमपीएससी ८ ऑक्टोबर २०२२ रोजी घेण्यात आलेल्या संयुक्त गट ब पूर्व परीक्षा २०२२ चा निकाल तब्बल १० महिने उशीरा लागल्याने ही परीक्षा दिलेल्या हजारो उमेदवारांची डोकेदुखी वाढली आहे. या काळात इतर परीक्षांमध्ये पात्र ठरलेले आणि विविध पदांवर नियुक्ती मिळालेले उमेदवारही पात्र ठरले आहेत. त्यामुळे उपनिरीक्षक पदासाठी झालेल्या या निकालात कट ऑफ वाढला असून अत्यंत कमी फरकाने हजारो विद्यार्थी अपात्र ठरत आहेत.
त्यामुळे एमपीएससीने विविध पदांवर नियुक्ती मिळालेल्या उमेदावारंना या निकालातून वगळून पुन्हा निकाल जाहीर करावा, अशी मागणी यापूर्वीच उमेदवारांनी केली होती. याबाबत विधानसभेत मुद्दाही उपस्थित करण्यात आला होता. मात्र त्याकडे सरकारने अद्याप लक्ष न दिल्याने उमेदवार हवालदिल झाले आहेत. कोरोना काळापासून आतापर्यंत झालेल्या परीक्षा वेळेवर न झाल्याने तसेच योग्य वेळी निकाल न लागल्याने आतापर्यंत साधारणतः दीड हजारच्या आसपास विविध पदांवर नियुक्तीस पात्र ठरलेले उमेदवार पुन्हा संयुक्त पूर्व परीक्षा २०२२ ला पात्र ठरले आहेत.
२० पट ऐवजी १६.६४ पट प्रमाणात उमेदवार पात्र केल्याने हजारो उमेदवार पूर्व परीक्षा निकालामध्ये ०.५ ते २.० इतक्या कमी गुणांनी अपात्र ठरत आहेत. अपात्र उमेदवार नैराश्येत गेले आहेत. हा आमच्या आयुष्याचा प्रश्न आहे. त्यामुळे एमपीएससीने याबाबत सहनभूतीपूर्वक आणि तातडीने विचार करावा. - एक उमेदवार