- प्रज्ञा म्हात्रे, ठाणे
एका प्रभागात एकाच वेळी चार उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी ‘मला एक मत द्या, बाकी तीन कुणालाही द्या’, असा प्रचार सुरू केला आहे. उमेदवारांच्या या ‘एकला चलो रे’ वृत्तीमुळे पक्षांना फटका बसू शकतो.सर्वच मोठ्या पक्षांचे उमेदवार जाहीर प्रचारादरम्यान प्रभागातील आपल्या पक्षाच्या चारही उमेदवारांसाठी मते मागत असले तरी गुप्तपणे मात्र स्वत:साठीच मत मागत आहेत. काहींचे आपल्याच पक्षातील अन्य उमेदवारांशी जमत नाही. अन्य पक्षांतून प्रतिस्पर्धी आलेले डोळ्यांत खुपत आहे किंवा गुन्हेगारी अथवा भ्रष्टाचाराची पार्श्वभूमी असलेल्या शेजारील वॉर्डातील स्वपक्षीयांची काळी सावली आपल्यावर पडू नये, याकरिता प्रत्येक उमेदवार आपली जागा सुरक्षित करण्याकरिता धडपडत आहे. उमेदवाराचे विश्वासू कार्यकर्ते, कुटुंबीय हे वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये जाऊन आपले सीट काढून द्या, अशी आर्जवं करीत आहेत.मागील २०१२ च्या महापालिकेच्या निवडणुकीत दोन सदस्यांचा एक प्रभाग होता. मात्र, आता चार सदस्यांचा एक प्रभाग झाल्याने उमेदवारांना स्वत:च्या वॉर्डाव्यतिरिक्त इतर वॉर्डांतून मते मागण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. आपल्या प्रभागातील अन्य उमेदवारांपेक्षा अधिक मताधिक्क्याने विजयी होण्याकरिता आपल्या उमेदवाराला जास्तीतजास्त मते मिळवून देण्यासाठी त्यांचे निकटवर्तीय कार्यकर्ते पडद्याआड अजब फंडे वापरत आहेत. केवळ स्वत:साठी मत मागण्याची उमेदवारांची ही कार्यशैली पक्षाच्या नेत्यांच्या कानांवर गेली आहे. काही उमेदवारांना याकरिता नेतृत्वाकडून समज दिली गेल्याचेही कळते. शेजारी शेजारील वॉर्डातील एकाच पक्षाच्या उमेदवारांमध्ये यामुळे वितुष्ट आल्याचे किस्से कानांवर येत असून काही पराभवाची चाहूल लागलेले उमेदवार आमच्याच पक्षाची मंडळी विरोधी प्रचार करीत असल्याने पराभूत झालो, हे सबळ कारण सांगत पराभवाचे खापर स्वपक्षीयांवर फोडायला मोकळी होणार आहेत.