लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : आपण आपली राष्ट्रीय किंवा राज्य स्तरावरील विकासकामे लोकांपर्यंत नेली पाहिजेत. कारण कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील. त्यामुळे सर्व मतभेद बाजूला ठेवावेत. सर्वांनी जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी महायुतीसाठी काम केले पाहिजे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी भांडुपमध्ये महायुतीच्या कार्यकर्त्यांना केले. भाजप नेत्यांसह शिवसेना, राष्ट्रवादी, आरपीआय (ए) आणि इतर घटक पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित होते.
एकनाथ शिंदे म्हणाले, मुंबई उत्तर पूर्व येथील अहवाल मिहीर कोटेचा यांच्या बाजूने आहेत. लोक जरी आमच्या बाजूने असले तरी मतदान होईपर्यंत आम्ही उसंत घेऊ नये. मुंबई उत्तर पूर्वमधील महायुतीचे उमेदवार मिहीर कोटेचा ३६५ दिवस लोकांसाठी काम करतात.
आपण त्यांना खासदार म्हणून मोठ्या मताधिक्याने निवडून दिले पाहिजे. मिहीर कोटेचा प्रचारादरम्यान म्हणाले, भांडुप, नाहूर, कांजुरमार्ग, विक्रोळीकरांना शिवसेनेने डम्पिंग ग्राउंड गिफ्ट दिले. लाखो नागरिकांच्या आरोग्याशी खेळ केला. देवनार आणि कांजूरमार्ग येथील डम्पिंग ग्राउंडचा करार २०२५ पर्यंत आहे. कराराला कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ देऊ देणार नाही. त्यासाठी पाठपुरावा करून हा प्रश्न सोडविला जाईल. हा भाग डम्पिंग मुक्त करूनच राहणार.शिवसेनेचे दत्ता दळवी महापौर असताना त्यांनी डम्पिंगच्या प्रस्तावाला विरोध न करता बिनशर्त मंजुरी दिली. प्रत्यक्षात नाहूर, भांडुप, कांजुरमार्ग, विक्रोळी येथे बहुसंख्य मराठी लोकवस्ती आहे.
या भागातून शिवसेनेचे आमदार, नगरसेवक मोठ्या संख्येने निवडून येत. मात्र, असे असताना शिवसेनेने येथील मराठी बांधवांच्या आरोग्याचा प्रश्न, जनतेचा विरोध का लक्षात घेतला नाही, डम्पिंगला विरोध का केला नाही, असा सवालही त्यांनी केला.