अंतर्गत निवडणुकीतून ठरणार उमेदवार

By admin | Published: May 28, 2016 03:33 AM2016-05-28T03:33:23+5:302016-05-28T03:33:23+5:30

शिवसेना-भाजपापाठोपाठ काँग्रेसही २०१७ च्या आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या जोरदार तयारीला लागली आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी यासंदर्भात

Candidates going to be elected through internal elections | अंतर्गत निवडणुकीतून ठरणार उमेदवार

अंतर्गत निवडणुकीतून ठरणार उमेदवार

Next

- मनोहर कुंभेजकर,  मुंबई

शिवसेना-भाजपापाठोपाठ काँग्रेसही २०१७ च्या आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या जोरदार तयारीला लागली आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी यासंदर्भात रणनीती आखली असून, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी पक्षांतर्गत उमेदवारांची चाचपणीही सुरू झाली आहे. या चाचपणीनुसार, यंदा पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये लोकप्रिय असलेल्या उमेदवाराला महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात येणार आहे.
काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासोबत संजय निरुपम यांनी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसंदर्भात सविस्तर चर्चा केली आहे. राहुल गांधी यांच्या मार्गदर्शनानुसार, फ्रान्सच्या प्रणालीप्रमाणे यंदा पक्षाच्या लोकप्रिय उमेदवाराची महापालिकेच्या निवडणुकीसाठी निवड करण्यात येणार आहे. काँग्रेस सदस्यांची प्रभागनिहाय यादी तयार करण्यात आली असून, इलेक्ट्रॉनिक मशिनच्या साहाय्याने माजी निवडणूक अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली पक्षांतर्गत लोकप्रिय उमेदवाराच्या निवडीसाठी मतदान होणार आहे. समजा पक्षाच्या प्रभागनिहाय उभ्या असलेल्या उमेदवारापैकी एका उमेदवाराला ५० टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळाली तर तो साहाजिक महानगरपालिकेच्या निवडणुकीत अधिकृत उमेदवार असेल. मात्र पक्षाच्या प्रभागनिहाय निवडणुकीत चार उमेदवार उभे आहेत आणि त्यांना २५ टक्के, २० टक्के, १५ टक्के आणि १२ टक्के मते मिळाली तर पुन्हा पहिल्या आणि दुसरा क्रमांक मिळालेल्या उमेदवारांमध्ये निवडणूक होईल. यामध्ये जास्त मते मिळवणारा उमेदवार हा महापालिकेच्या निवडणुकीत त्या प्रभागाचा अधिकृत उमेदवार असेल, असे निरुपम यांनी सांगितले.

सद्य:स्थितीमध्ये पालिकेत शिवसेनेच्या खालोखाल काँग्रेसचे ५२ नगरसेवक असून, १९९४ सालापासून पालिकेत शिवसेनेचाच महापौर आहे. त्यापूर्वी महापौरपदी काँग्रेसचे रा. ता. कदम यांची १९९५-९६ साली निवड झाली होती. त्यानंतर मात्र आजपर्यंत पालिकेत शिवसेनेचा नगरसेवक महापौरपदी विराजमान आहे.
लोकसभा निवडणुकीत उमेदवार निवडण्यासाठी जशी पद्धत काँग्रेसने वापरली होती; तशीच पद्धत मुंबई महापालिका निवडणुकीत वापरा, अशा सूचना राहुल गांधी यांनी मुंबईतील काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांना दिल्या आहेत, अशी माहिती निरुपम यांनी दिली.
काँग्रेसची ही पहिली अंतर्गत निवडणूक प्रक्रिया मुंबईतील २२७ प्रभागांत राबविण्यात येणार आहे. शिवाय लवकरच पक्षातर्फे कार्यकर्ता नोंदणी मोहीम मुंबईत मोठ्या प्रमाणात राबवणार आहे.
यापूर्वी उमेदवाराचा पराभव झाला तर निवडणुकीत पक्षाने कमजोर उमेदवार दिल्यामुळे पराभव झाला, असा आरोप केला जात होता. त्यालाही या प्रणालीमुळे आता आळा बसेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. पक्षाच्या अंतिम उमेदवाराची निवड निवडणुकीपूर्वी लवकर जाहीर करण्यासाठी काँग्रेसचा प्रयत्न असेल.

Web Title: Candidates going to be elected through internal elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.