- शेफाली परब-पंडित मुंबई : लोकप्रतिनिधी निवडणुकीच्या काळातच मतदारसंघात फिरकतात, अशी मतदारांची सर्वसामान्य तक्रार असते. अनेक समस्या वर्षोन्वर्षे तशाच कायम असतात, मात्र त्यांना न्याय मिळत नाही. त्यामुळे आपले प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत मतदान नाही, असा पावित्रा दक्षिण मुंबईतील मतदार घेत असल्याचे दिसून येत आहे. त्यांच्या या रोषाचा सामना शिवसेना व काँग्रेस उमेदवारांनाही गेल्या काही दिवसांमध्ये करावा लागला आहे.लोकसभा निवडणुकीसाठी मुंबईत चौथ्या टप्प्यात म्हणजे २९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे प्रचारासाठी शेवटचा आठवडा उरला असल्याने उमेदवार आपल्या मतदारसंघातील प्रत्येक कोपरा पिंजून काढू लागले आहेत. प्रत्येक मतदाराला हात जोडून त्यांचे मतं आपल्या पारड्यात टाकण्याची गळ उमेदवार घालत आहेत. यासाठी निवडून आल्यावर अमकंतमकं देण्याचे आश्वासही मतदारांना दिले जात आहेत. ाात्र यापैकी किती आश्वासन लोकप्रतिनिधी पाळतात? असा सवाल नागरिक करीत आहेत. निवडणुकीत कोणीही उभे असले तरी आमचे प्रश्न जैसे थेच आहे, अशी नाराजी रहिवाशी व्यक्त करीत आहेत. दक्षिण मुंबईतही असे अनेक मुद्दा निवडणुकीच्या निमित्ताने चर्चेत आले आहेत....आणि मतदार संतापलेगेल्या आठवड्यात शिवसेनेचे उमेदवार अरविंद सावंत ना.म. जोशी मार्गावरील बी.डी.डी चाळीत प्रचाराला गेले असता मतदारांनी त्यांच्याकडे तीव्र नाराजी व्यक्त केली.कुलाबा, गिता नगर येथे काँग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरा यांची आज रॅली होती. मतदारांची भेट घेत ते गिता नगर झोपडपट्टीतून फिरत होते. मात्र या परिसरात पाणी, शौचालय, आरोग्याच्या प्रमुख समस्या असल्याची तक्रार मतदारांनी केली.कोस्टल रोड प्रकल्पामुळे मच्छिमारांची उपजीविकेचे साधन नष्ट होणार आहे. मात्र राजकीय पक्षांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. असा आरोप करीत वरळी कोळीवाड्यातील मच्छिमारांनी निषेधाचे फलक लावत मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचे स्पष्ट केले. मात्र पोलिसांनी त्यांची नावं लिहून घेतली असून त्यांचीच चौकशी केली जात आहे, अशी तक्रार मच्छिमार करीत आहेत.
उमेदवारांना करावा लागतोय मतदारांच्या रोषाचा सामना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 3:02 AM