मुंबई : गुढीपाडव्याच्या निमित्ताने मुंबई आणि उपनगरांत आयोजित केल्या जाणाऱ्या शोभायात्रांना यंदा राजकीय रंग चढणार आहे. शोभायात्रांच्या निमित्ताने प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार प्रचार करण्याच्या तयारीत आहेत. त्यासाठी शोभायात्रांच्या आयोजनात पक्ष, नेते आणि उमेदवार पुढाकार घेत आहेत.
मुंबईत दादर, घाटकोपर, लालबाग आणि गिरगावमध्ये मोठ्या प्रमाणावर शोभायात्रांचे आयोजन करण्यात येते. यंदा गिरगावात उद्धवसेनेच्या शाखांकडून स्थानिक पातळीवर शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे, तर दुसरीकडे शरद पवार गटाच्या राखी जाधव यांनी शोभायात्रेचे आयोजन केले असून, याचे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरकडून जोरदार प्रमोशन सुरू आहे. त्याचप्रमाणे, मुलुंडमध्ये होणाऱ्या मुलुंड महोत्सवातही स्थानिक नेत्यांसह उमेदवार सहभाग घेऊन मतदारांचे म्हणणे ऐकून घेणार आहेत.
भाजपकडून गुढीपाडव्यानिमित्त शहर उपनगरात ४०० कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात यंदा राम मंदिराच्या पार्श्वभूमीवर हिंदुत्त्वाची गुढी उभारून स्वागत करुया, असे म्हणत १ हजार ठिकाणी बैठका व जनसभांचे आयोजन करण्यात येणार आहे.
नवमतदार रडारवर -
१) शोभायात्रांमध्ये सहभागी होणाऱ्या तरुणपिढीची संख्या पाहता यातील नवमतदारांशी चर्चा करण्यावर , फोटो आणि व्हिडीओद्वारे प्रचार करण्यावर उमेदवारांसह नेत्यांचा अधिक कल आहे.
२) मागील काही वर्षांपासून सोशल मीडियावरील स्टोरीज, स्टेटस , रिल्स, शाॅर्ट व्हि़डीओजचा प्रभाव पाहता या माध्यमातून प्रचार करण्यावर अधिक भर देणार असल्याचे एका प्रमुख पक्षाच्या सोशल मीडिया टीममधील हेडने सांगितले.
शक्तिप्रदर्शनाची संधी-
१) शोभायात्रांच्या निमित्ताने राजकीय पक्षांतील नेते, उमेदवार आपल्या कार्यकर्त्यांसह यात सहभाग घेऊन शक्तीप्रदर्शन करणार आहेत.
२) त्यामुळे याबाबत अनेक राजकीय पक्षांनी स्थानिक पातळीवर त्याबाबत पूर्वतयारी, बैठका घेऊन अधिकाधिक तरुण कार्यकर्त्यांना या ठिकाणी उपस्थिती लावण्याचे आदेश दिले आहेत.
३) शिवाय, महिला मतदारांचे लक्ष वेधण्यासाठी थेट घरोघरी जाऊन गृहिणींची भेट घेऊन त्यांना शोभायात्रांचे आमंत्रण, सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होण्यास सांगण्यात येत आहे, अशी माहिती दक्षिण मुंबईतील शिंदेसेनच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.