Join us  

उमेदवार एकीकडे, कार्यकर्ते भलतीकडेच; जेमतेम आठवडा राहिल्याने प्रचाराला आला वेग

By संतोष आंधळे | Published: May 12, 2024 12:39 PM

उमेदवार एकीकडे आणि कार्यकर्ते भलतीकडेच असल्याचे चित्र सध्या प्रत्येक मतदारसंघात पाहावयास मिळत आहे.

संतोष आंधळे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : पाचव्या टप्प्यातील निवडणुकीच्या प्रचारास आता काही दिवसच उमेदवारांच्या हातात राहिले आहेत. त्यामुळे शेवटच्या दिवसांत जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा उमेदवारांचा प्रयत्न आहे. लोकसभा मतदारसंघाचा व्याप मोठा असल्याने उमेदवाराला प्रत्येक ठिकाणी जाणे शक्य नाही. त्यामुळे आता शेवटच्या काही दिवसांत उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी कुठे व कसा प्रचार करायचा याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे उमेदवार एकीकडे आणि कार्यकर्ते भलतीकडेच असल्याचे चित्र सध्या प्रत्येक मतदारसंघात पाहावयास मिळत आहे.

मुंबईसह १३ लोकसभा मतदारसंघाचे पाचव्या टप्प्यातील मतदान २० मे रोजी होणार आहे. १८ मे रोजी प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. त्यामुळे प्रचारासाठी केवळ सात दिवस हाती राहिले आहेत. त्यामुळे शेवटच्या दिवसांत प्रचाराचे स्वरूप बदलण्याचा निर्णय सगळ्याच उमेदवारांनी घेतला आहे. अर्ज भरण्याच्या शेवटच्या मुदतीपूर्वी  तीन-चार दिवस आधी उमेदवारी जाहीर झालेल्या उमेदवारांसाठी तारेवरची मोठी कसरत आहे. नेत्यांच्या बैठकीचे महत्त्वाच्या ठिकाणी नियोजन केले जात आहे. तेथे शक्तिप्रदर्शन कसे करता येईल, याचे नियोजन करण्यात येत आहे. यासाठी विश्वासू कार्यकर्त्यांची फौज कामाला लागली आहे.  त्यासोबतच मतदारसंघातील काही प्रभावशाली व्यक्तींकडे जाऊन आपल्या बाजूचा प्रचार कसा करता येईल, याची चाचपणी करण्यात येत आहे. या काळात जास्तीत जास्त कार्यकर्ते मतदारसंघ ढवळून काढतील, यासाठी सर्व प्रयत्न केले जात आहेत.

एलईडी व्हॅनचा वापर 

मतदारसंघातील मुख्य ठिकाणांची यादी तयार केली आहे. तेथे रेकॉर्डेड संदेश आणि चित्रफीत दाखविण्यासाठी एलईडी व्हॅनचा वापर करण्यात येत आहे. या व्हॅनमध्ये मोजके दोन कार्यकर्ते असतात. गर्दीच्या ठिकाणी तास-दोन तासांसाठी व्हॅन उभी करून चित्रफीत दाखविली जाते. व्हॅन विविध भागांत फिरविली जाते. 

टॅग्स :महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४लोकसभा निवडणूक २०२४मतदान