- स्नेहा मोरे मुंबई - मागील काही वर्षांपासून निवडणुकांमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचारावर अधिक भर दिला जात आहे. विविध राजकीय पक्षांनीही कात टाकत पारंपरिक प्रचार ते सोशल मीडिया असा वाॅर रूमपर्यंत वेगाने बदल केला आहे. त्यानंतर आता उमेदवारांमध्ये प्रचारासाठी स्वतंत्र खासगी सोशल मीडिया नेटवर्किंग संस्थांना काम देण्याचा कल वाढत आहे. सोशल मीडिया नेटवर्किंग संस्था काही क्षणांतच मतदारांशी रीअल टाइम कनेक्ट ठेवत असल्याने मतदारांच्या भूमिका जाणून घेण्याचा मार्ग अधिक सुकर होत आहे. या माध्यमातून मतदारांचा कौल घेतला जातो. त्याचप्रमाणे उमेदवारांना कुठल्या विभागात अधिक लक्ष द्यावे लागणार आहे, याबाबतही काम करता येते. सोशल मीडिया नेटवर्किंगसाठी लाखो रुपये मोजावे लागतात.
या संस्था करतात काय? सोशल मीडिया नेटवर्किंग संस्थेद्वारे मतदारांची नोंदणी, यादी अद्ययावत करणे, उमेदवारांची विकासकामे मतदारांपर्यंत पोहोचविणे, मतदारसंघातील विरोधकांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे, विरोधकांना सोशल मीडियाद्वारे - फलकबाजीतून प्रत्युत्तर देणे, वयोगटनिहाय- लिंगनिहाय, समाज-समुदायनिहाय मतदारांमध्ये विशेष प्रचार मोहीम राबविणे, मतदारांचे म्हणणे उमेदवारांपर्यंत रीअल टाइममध्ये पोहोचवून दोहोंमध्ये पारदर्शी संवाद निर्माण करणे, असे काम केले जाते. या संस्थांना काम देण्यात भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत. मोठा खर्च करून ते अद्ययावत यंत्रणा उभारत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्याखालोखाल, काँग्रेसचे आणि उद्धव सेनेचे उमेदवार सोशल मीडिया नेटवर्किंग संस्थांना काम देऊनही अद्ययावत राहण्याचा प्रयत्न करीत आहेत.