Join us

उमेदवारांनो रिलॅक्स... ऑफलाईन अर्ज भरण्यास निवडणूक आयोगाची परवानगी

By महेश गलांडे | Published: December 29, 2020 6:44 PM

राज्यभरात नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची मुदतही वाढविण्यात आली असून उद्या म्हणजेच 30 जानेवारी रोजी सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे.

मुंबई - राज्यातील 14,234 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी अर्ज दाखल करण्यास एक दिवसाचा अवधी बाकी असल्याने उमेदवारांची एकच झुंबड उडाली. ऑनलाईन कार्यालयात उमेदवारांच्या रांगाच रांगा लागल्या आहेत. मात्र, सर्व्हर डाऊन झाल्याने एकेका उमेदवाराला अर्ज दाखल करण्यासाठी ताटकळत थांबावे लागले. मात्र, नागरिकांच्या तक्रारी आणि नेतेमंडळींनी हा मुद्दा उचलून धरल्याने निवडणूक आयोगाने नवीन आदेश जारी केला आहे. त्यानुसार, नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी पारंपरिक पद्धतीचा म्हणजे ऑफलाईन मोडमध्ये सादर करण्याचा आदेश निघाला आहे. 

राज्यभरात नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची मुदतही वाढविण्यात आली असून उद्या म्हणजेच 30 डिसेंबर रोजी सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे. निवडणूक आयोगाच्या संकेत स्थळावर अर्जाचा पाऊस पडल्याने सर्व्हर डाऊन झाले होते. त्यामुळे अनेक उमेदवारांना नामांकन भरण्यासाठी चक्क रांगा लावाव्या लागल्या. त्यात भारत दूरसंचार सेवा विस्कळीत झाल्याने इंटरनेट सुविधाही कोलमडली होती. त्यामुळे दुपारपर्यंत उमेदवार हातात अर्ज घेऊन रांगेत होते.

विखे पाटलांनी केली होती मागणी

आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी मोठ्या प्रमाणात होत असलेली गर्दी आणि नेट सुविधेतील अडथळ्यामुळे आयोगाच्या वेबसाईट हॅंग होण्याचे प्रमाण वाढल्याने इच्छुक उमेदवारांना अर्ज दाखल करण्यात मोठ्या समस्या निर्माण होत असल्याकडे आयोगाचे लक्ष वेधले होते. त्यातच मागील तीन दिवस लागोपाठ आलेल्या सुट्यांमुळे अर्ज दाखल करण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रही शासकीय कार्यलयातून वेळेत मिळाली नसल्याची बाब आ. विखे पाटील यांनी लक्षात आणून दिली. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी येत असलेल्या या आडचणी गृहीत धरून ऑफलाईन अर्ज दाखल करून घेण्याबाबत आयोगाने विचार करून मुदत वाढही द्यावी आशी मागणी विखे पाटील यांनी केली होती. 

टॅग्स :मुंबईनिवडणूकग्राम पंचायत