Join us

उमेदवारांनी नियमात बसविला खर्च

By admin | Published: May 27, 2015 12:42 AM

महापालिका निवडणुकीमध्ये पैशांची प्रचंड उधळपट्टी झाल्याची चर्चा शहरभर आहे. काही उमेदवारांनी कोटीच्या मर्यादाही ओलांडल्याचे बोलले जाते.

नामदेव मोरे ल्ल नवी मुंबईमहापालिका निवडणुकीमध्ये पैशांची प्रचंड उधळपट्टी झाल्याची चर्चा शहरभर आहे. काही उमेदवारांनी कोटीच्या मर्यादाही ओलांडल्याचे बोलले जाते. परंतु प्रत्यक्षात मात्र सर्वांनी निवडणूक आयोगाने दिलेल्या मर्यादेमध्येच खर्च बसविला आहे. ५०५ उमेदवारांनी खर्चाचा तपशील सादर केला आहे. ६३ जणांनी मात्र हिशेब दिलेले नसून त्यांच्यावर नियमाप्रमाणे कारवाई होणार आहे. नवी मुंबई महानगरपालिकेची पाचवी पंचवार्षिक निवडणूक सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी प्रतिष्ठेची बनविली होती. तब्बल ५६८ जणांनी निवडणूक लढविली. बहुतांश सर्वच उमेदवारांनी निवडणूक सुरू होण्यापूर्वी व निवडणुका सुरू झाल्यानंतरही मतदारांची मने जिंकण्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च केला. निवडणुकीपूर्वी हळदीकुंकू समारंभ, आरोग्य शिबिरापासून इतर कार्यक्रमांवर लाखो रुपये खर्च करण्यात आले. निवडणूक विभागाने ४ लाख रुपये खर्चाची मर्यादा घालून दिल्यामुळे सर्वच उमेदवारांना हिशेब नियमात बसविताना तारेवरची कसरत करावी लागत होती. अनेकांनी चार्टर्ड अकाऊंटंटची मदत घेतली होती. अनेकांनी यापूर्वी निवडणुका लढविलेल्यांकडून सल्ला घेवून खर्च करण्यास सुरुवात केली होती. वास्तविक बहुतांश सर्व प्रमुख उमेदवारांनी लाखो रुपये निवडणुकीत खर्च केल्याचे मतदार सांगत आहेत. काही प्रभागांमध्ये एक कोटीपेक्षा जास्त खर्च करण्यात आला. निवडणुका संपल्या तरी खर्चाच्या आकड्यांची चर्चा अद्याप संपलेली नाही. कोणी किती खर्च केले. बंडखोरांना शांत करण्यासाठी किती पैसे दिले. संस्था, संघटना व इतर ठिकाणी दिलेल्या देणग्यांचीही चर्चा सुरू आहे. नागरिकांनीही होणारा खर्च पाहून आश्चर्य व्यक्त केले होते. परंतु प्रत्यक्षात मात्र हिशेब सादर करताना सर्वांनी ४ लाख रुपयांच्या आतमध्ये हिशेब बसविला आहे. निवडणूक लढविलेल्या ५६८ उमेदवारांपैकी ५०५ जणांनी हिशेब सादर केले आहेत. काँगे्रस, राष्ट्रवादी, शिवसेना, भारतीय जनता पक्ष, शेतकरी कामगार पक्षाच्या सर्व उमेदवारांनी व पक्षाने त्यांचे हिशेब दिले आहेत. कोपरखैरणे प्रभाग ४५ मधील राष्ट्रवादी काँगे्रसच्या उमेदवार संगीता म्हात्रे यांनी ३ लाख ७४ हजार ३७७ रुपये खर्च केल्याचे सादर केले आहे. यामध्ये पक्षाच्या खर्चाचाही समावेश आहे. सर्वात कमी खर्च दिघा प्रभाग ३ मधील उमेदवार सरस्वती पूर्णे यांनी केला आहे. त्यांनी फक्त २८०० रुपये खर्च केल्याचे प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. ६३ उमदेवारांनी खर्च सादर केलेला नाही. च्प्रचारावरील खर्चाचा लेखाजोखा /३च्ज्यांनी हिशेब सादर केला नाही त्यांची नावे राज्य निवडणूक विभाग व कोकण आयुक्तांकडे देण्यात येणार आहेत. संबंधितांवर नियमाप्रमाणे कारवाई होणार असून त्यांना पुढील किमान तीन वर्षे पालिकेची निवडणूक लढविता येणार नाही. विशेष म्हणजे कोणीही चार लाखांच्या खर्चाची मर्यादा ओलांडली नसल्याचे स्पष्ट झाले असून त्याविषयी आश्चर्य व्यक्त केले जात आहे.