‘मतदार राजा’च्या दारी उमेदवार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2019 01:04 AM2019-04-08T01:04:03+5:302019-04-08T01:04:04+5:30
मुंबई : उमेदवारी जाहिर झाल्यानंतर मुंबईत प्रचाराला सुरूवात झाली़ सुरूवातीला प्रचारास हवी तशी सुरूवात झाली नव्हती़ मात्र जसजसा मतदानाचा ...
मुंबई : उमेदवारी जाहिर झाल्यानंतर मुंबईत प्रचाराला सुरूवात झाली़ सुरूवातीला प्रचारास हवी तशी सुरूवात झाली नव्हती़ मात्र जसजसा मतदानाचा दिवस जवळ येतोय उमेदवार प्रत्येक मतदाराच्या घरी जाण्याचा प्रयत्न करतोय़ कुठे रोड शो, कुठे सायकलस्वारी, तर कुठे विविध युक्त्या लढवत उमेदवार मतदाराला आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत़ रविवाराचा दिवस सार्थी लावण्यासाठी उमेदवारांनी विशेष नियोजन केले होते़
उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघातील भाजपचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांनी रविवारी प्रचार फेऱ्यांवर जोर दिला; तर काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांनी प्रचार फेऱ्यांसह बैठकांवर जोर दिल्याचे चित्र होते. परिणामी, दोन्ही उमेदवार आपापल्या मतदारांना आकर्षित करण्याकडे गुंतले असून, उर्मिला या सोमवारी सकाळी आपला उमेदवारी अर्ज वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल करणार आहेत.
गोपाळ शेट्टी यांचा प्रचार आणि प्रसार दौरा रविवारी भल्या पहाटेच सुरू झाला. कांदिवली, दहिसर आणि बोरीवली येथील प्रचार फेरी पूर्ण करत असतानाच, शेट्टी यांनी छोट्या-मोठ्या कार्यक्रमातही सहभाग नोंदविला. तेलगू समाज मेळावा, कुणबी समाज मेळावा, राम नवमी महोत्सव, यज्ञ महोत्सव, सिंधी पंचायत आणि सत्यनारायण महापूजा; अशा कार्यक्रमांचा यात समावेश होता. चारकोपमधील कुणबी आणि लेवा पाटीदार समाजाने एकमुखाने गोपाळ शेट्टी यांना मत देण्याचा संकल्प केला आहे. कांदिवली पश्चिम येथील भाजप चारकोप निवडणूक कार्यालय येथे रविवारी संध्याकाळी कुणबी आणि लेवा पाटीदार समाजाच्या झालेल्या बैठकीत या दोन्ही समाजाने एकमुखाने हा निर्णय घेतला. बैठकीबद्दल बोलताना अरविंद वजीरकर -कुणबी समाज मंडळ, कांदिवली शाखा सचिव यांनी सांगितले की, आमच्या समाजाने एकत्रितपणे निर्णय घेतला आहे की, कुठल्याही परिस्थितीत आम्ही गोपाळ शेट्टी यांनाच निवडून देऊ. आम्ही घरोघरी जाऊन लोकांशी संवाद साधून, पत्रके वाटून शेट्टी यांचा प्रचार करणार आहोत.
आमची एकगठ्ठा १००% मतं आम्ही शेट्टी यांनाच देऊ. निवडणुकीच्या काळात कोणीही मुंबईबाहेर जाणार नाही त्याचे बहुमूल्य मत शेट्टी यांनाच जाईल. कांदिवली येथील चारकोपमध्ये कुणबी समाज मोठ्या प्रमाणात वास्तव्यास असून, आमच्या संस्थेशी सुमारे ६ हजार कुणबी जोडले गेलेले आहेत. बॉलीवूड गर्ल आणि काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला यांनीही रविवारचा दिवस बैठक आणि गाठीभेटीसाठी दिला.
गाठीभेटी आणि अर्जाची तयारी
दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील युती आणि आघाडीच्या उमेदवारांनी रविावारच्या पदयात्रांमध्ये आवर्जुन चर्चला भेट देऊन उपस्थितांशी संवाद साधला. अर्ज भरण्यापुर्वीचा हा शेवटचा रविवार असल्याने एकीकडे नियमित प्रचार आणि दुसरीकडे सोमवारी अर्ज भरतेवेळी काढायच्या पदयात्रेची नियोजन अशी कसरत शिवसेना आणि काँग्रेस उमेदवारांना करावी लागली. शिवसेना उमेदवार खासदार राहुल शेवाळे यांनी जनसंवाद यात्रा काढल्या. आज सायन कोळीवाडा विधानसभेसाठी वेळ निश्चित होती. गणेश नगर, शिवशंकर नगर, कमलाराम नगर, बरकत अली, रमामात वाडी, आनंद वाडी, पंशील नगर, राजीव गांधी नगर, गणेश नगर अशी निघालेली पदयात्रा शिवसेनेच्या शाखा क्रमांक १८० जवळ संपली. तर, कॉंग्रेसच्या एकनाथ गायकवाडांनी सकाळी चर्चला भेटी दिल्या. त्यानंतर चेंबूर येथे गाठीभेटींचा कार्यक्रम होता.
लग्नसमारंभ, घरगुती कार्यक्रमात पोहोचले उमेदवार
लग्न तसेच घरगुती समारंभ प्रचाराचे ठिकाण ठरतानाचे चित्र उत्तर पूर्व मुंबईत दिसून येत. यूतीच्या उमेदवारासह आघाड़ीची टिक टिक याठीकाणी जाताना दीसली. रविवारही बैठकांसह अशा समरंभात उमेदवारांनी हजेरी लावली.
रविवारी सकालपासून आघाड़ीच्या उमेदवाराने ईशान्य मुंबईतील उद्यानात मॉर्निंग वॉक करत प्रचाराला सुरवात केली. पुढ़े मंदिर, विविध समारंभात भेंटी घेत त्यांनी बैठकांवर भर दिला. तर यूतीचे उमेदवारही त्या पद्धतीने फिरताना दिसले. सोमवारी युतीचे उमेदवार मनोज कोटक अर्ज़ भरणार आहेत. युतीच्या वरिष्ठ अधिका-यांसह ईशान्य मुंबईतील सर्व पदाधिकारी यात सहभागी होणार आहेत. गुजरात तसेच पश्चिम भारतातूनही कार्यकर्ते, नातेवाईक मंडली मुंबईत दाखल झाले आहेत. मोठया प्रमाणत शक्तिप्रदर्शन करण्याच्या दिशेने तयारी सुरु आहे. अंबाजी धाम येथून या मिरवणूकीची सुरवात होईल. दूसरीकड़े आघाड़ीचे उमेदवार संजय पाटील मंगलवारी अर्ज़ भरतील. दोघाँनीही त्या पद्धतीने तयारी केली आहे.