उमेदवारांची होणार भाऊगर्दी

By admin | Published: May 23, 2015 10:39 PM2015-05-23T22:39:02+5:302015-05-23T22:39:02+5:30

महानगरपालिका निवडणुकीनिमित्त येथे सध्या सर्वच राजकीय पक्षांची धावपळ सुरू आहे. आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी विविध राजकीय पक्षांनी पत्रकार परिषद घेण्याचा सपाटा लावला आहे.

The candidates will be the brother-in-law | उमेदवारांची होणार भाऊगर्दी

उमेदवारांची होणार भाऊगर्दी

Next

वसई : महानगरपालिका निवडणुकीनिमित्त येथे सध्या सर्वच राजकीय पक्षांची धावपळ सुरू आहे. आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी विविध राजकीय पक्षांनी पत्रकार परिषद घेण्याचा सपाटा लावला आहे. काँग्रेसची पत्रकार परिषद पार पडल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही आयोजन केले आहे. जनतादलानेही (धर्मनिरपेक्ष) महानगरपालिकेची निवडणूक गांभीर्याने घेतली आहे. पक्षाची रणनिती स्पष्ट करण्यासाठी त्यांनीही पत्रकार परिषद बोलावली आहे. या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसल्यामुळे उमेदवारांची भाऊगर्दी होण्याची शक्यता आहे. मनसे, रिपाइं या दोन्ही पक्षांनीही रिंगणात उतरण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे प्रत्येक प्रभागामध्ये किमान ८ ते १० उमेदवार असतील, असा अंदाज आहे.
वसई जनआंदोलन समितीनेही ही निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. संभाव्य उमेदवारांच्या मुलाखतीही पार पडल्या असून पक्ष ग्रामीण भागातील प्रभाग लढवण्याच्या मनस्थितीत आहे. सेना-भाजपा युतीने अद्याप आपले पत्ते खोलले नाही. बँकेच्या निवडणुकीवर लक्ष केंद्रीत केल्यामुळे सध्यातरी त्यांच्या तंबुत शांतता आहे. परंतु ही निवडणूक युतीच्या माध्यमातून लढवण्याचा बेत पक्षांनी व्यक्त केला आहे. लवकरच मुंबईतील वरिष्ठ नेते या संदर्भात आपला निर्णय घेतील, असा अंदाज आहे. बहुजन विकास आघाडीला रोखण्यासाठी हे दोन्ही पक्ष युती करण्याच्या मनस्थितीत आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्षांना पराभवाला सामोरे जावे लागले. हा अनुभव लक्षात घेऊन कोणत्याही परिस्थितीत युती करायचीच, हा प्रयत्न पदाधिकाऱ्यांचा आहे.
काँग्रेसने कोणत्याही पक्षाशी आघाडी करणार नसल्याचे जाहीर केले. असे असले तरी, राष्ट्रवादीने समविचारी पक्षाबरोबर जागा वाटपासंदर्भात चर्चा होईल, असे म्हटले आहे. त्यामुळे शेवटच्या क्षणी आघाडी होण्याचा अंदाज आहे.
मनसेने मात्र ‘एकला चलो रे’ भूमिका स्वीकारली आहे. वसई विरार परिसरात मनसेचा संसार अद्याप सुरळीत न झाल्यामुळे या निवडणुका एकाकीपणे लढवण्याशिवाय गत्यंतर नाही. केंद्र व राज्य स्तरावर रिपाइं -सेना-भाजपा युतीबरोबर असली तरी येथे स्थानिक नेते मात्र काँग्रेस पक्षाशी समझोता करण्याच्या मनस्थितीत आले आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण वसईच्या दौऱ्यावर असताना वसई रिपाइंचे नेते अ‍ॅड. ईश्वर धुळे त्यांची भेट घेण्यासाठी येथे आले होते. मनसेचे नेते प्रविण भोईर यांनी मागील निवडणूक लोकहितवादी पार्टीच्या तिकिटावर लढवली होती. यंदा त्यांचा प्रभाग आदिवासी महिलेसाठी आरक्षित झाल्यामुळे त्यांची कोंडी झाली आहे. विशेष म्हणजे, त्यांना पत्नीचे नावही पुढे करणे शक्य नाही.
बहुजन विकास आघाडीकडे सुमारे साडेचार ते पाच हजार उमेदवारी अर्ज आल्याने पक्षाचे वरिष्ठ नेते अडचणीत सापडले आहेत. जुने व नवे असा वाद रंगत असल्यामुळे ज्येष्ठ नेते आमदार ठाकूर यांनी सर्वच इच्छुक उमेदवारांना एकत्र बसून निर्णय घ्या, असे सांगितले आहे.

४प्रशासनाने निवडणुका शांततेत व सुरळीत पार पडण्यासाठी विविध स्तरावर उपाययोजना सुरू केल्या आहेत. जाहीराती, पेडन्यूज व अन्य बाबींवर नियंत्रण ठेवण्यासाठी समितीची स्थापना केली आहे. आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीसाठी दहा विभागात निरिक्षण पथके नियुक्त केले आहे. प्रचारादरम्यान आचारसंहितेचे उल्लंघन, कायदा व सुव्यवस्था बिघडू नये,उमेदवाराने दररोज होणाऱ्या खर्चाचा गोषवारा संबंधित निवडणूक शाखेला देणे, प्रचाराची व्हिडोओ शुटींग करणे व पोलिसांसमवेत समन्वय साधून निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडणे आदी कामावर आयोगाने आपले लक्ष केंद्रीत केले आहे. सन २००९ मध्ये प्रचारादरम्यान घडलेल्या हिंसक घटना लक्षात घेऊन पोलीस यंत्रणाही सक्रीय झाली असून बंदोबस्तासाठी अतिरीक्त पोलीसबळ मागवण्यात येणार आहे.

Web Title: The candidates will be the brother-in-law

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.