महायुतीत उमेदवारच ठरेनात; कुणाच्या किती जागा आहेत बाकी?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2024 12:12 PM2024-04-10T12:12:27+5:302024-04-10T12:13:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : महाविकास आघाडीचे जागावाटप अखेर जाहीर झाले, पण काँग्रेसचे चार मतदारसंघांतील, तर शरद पवार ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महाविकास आघाडीचे जागावाटप अखेर जाहीर झाले, पण काँग्रेसचे चार मतदारसंघांतील, तर शरद पवार गटाचे तीन मतदारसंघांमधील उमेदवार अद्याप अधिकृतपणे जाहीर झालेले नाहीत. आपल्या वाट्याच्या सर्व २१ जागा उद्धवसेनेने जाहीर केल्या आहेत. तर महायुतीत सर्व जागांचे आपसातील वाटप अद्यापही होऊ शकलेले नाही. नाशिक, सातारा, पालघर, ठाणे, रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि उत्तर-पश्चिम मुंबई, दक्षिण मुंबई या सात जागा महायुतीत कोणत्या पक्षाकडे याचा फैसला होऊ शकलेला नाही. उत्तर-मध्य मुंबईची जागा भाजपकडे आहे, पण तिथे पूनम महाजन की आणखी कोणी याचा फैसला भाजपने अद्याप केलेला नाही.
पालघर, उत्तर-पश्चिम मुंबई शिंदेसेनेला, तर रत्नागिरी-सिंधुदुर्ग भाजपकडे जाईल, अशी शक्यता आहे. नाशिक व सातारा हे दोन मतदारसंघ एकमेकांमध्ये अडकले आहेत. ठाण्यात भाजप व शिंदेसेनेत रस्सीखेच कायम आहे.
समन्वयाच्या अभावाचा अहवाल
nकाही मतदारसंघांमध्ये महायुतीतील तीन पक्षांत चांगला समन्वय नसल्याची बाब समोर आली आहे. या संदर्भात भाजपच्या यंत्रणेकडून मतदारसंघनिहाय अहवाल मागविण्यात आले असल्याची माहिती आहे.
nत्यात परभणी, हिंगोली, अमरावती, नंदुरबार, उस्मानाबाद येथे तीन पक्षांच्या स्थानिक यंत्रणेमध्ये चांगला समन्वय नसल्याची बाब समोर आली आहे, असे सूत्रांनी सांगितले.
मविआत काय स्थिती?
शरद पवार गटाने अद्याप सातारा, माढा, रावेरच्या जागेवरील उमेदवार जाहीर केलेले नाहीत. सातारमध्ये माजी मंत्री शशिकांत शिंदे यांच्या नावाची चर्चा आहे. रावेरमध्ये श्रीराम पाटील यांचे नाव समोर आले आहे. मोहिते घराणे काय निर्णय घेते यावर माढाचा उमेदवार अवलंबून असेल.
काँग्रेसने जालना, धुळे, उत्तर-मध्य मुंबई आणि उत्तर मुंबईचे उमेदवार निश्चित केलेले नाहीत.
महाविकास आघाडीतील उद्धवसेना असा एकच पक्ष आहे की, ज्याने सर्व २१ उमेदवार जाहीर केले आहेत.