लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जाहीर केलेली ऋतुजा लटके यांची उमेदवारी तांत्रिकदृष्ट्या लटकल्याचे चित्र बुधवारी निर्माण झाले. मुंबई महापालिकेच्या सेवेत असलेल्या लटके यांनी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नोकरीचा राजीनामा दिला खरा; मात्र महापालिकेेने अद्याप राजीनामाच स्वीकारला नसल्याचे उघड झाले. लटके यांनी याबाबत उच्च न्यायालयाकडे दाद मागितली असून, यावर गुरुवारी तातडीने सुनावणी होईल. उमेदवारी अर्ज भरण्याची १४ ऑक्टोबर ही अंतिम तारीख आहे.
आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर शिवसेनेने तिथे लटके यांच्या पत्नी ऋतुजा यांना उमेदवारी दिली आहे. नोकरीचा राजीनामा मंजूर करावा, यासाठी ऋतुजा गेल्या तीन दिवसांपासून पालिकेत फेऱ्या मारत आहेत. त्यांनी बुधवारी पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांची भेट घेतली.
जाणूनबुजून विलंब, याचिकेत आरोपलटके यांनी राजीनाम्यासंदर्भात बुधवारी उच्च न्यायालयात धाव घेतली. राजीनामा स्वीकारल्याचे पत्र देण्यास महापालिका जाणूनबुजून विलंब करत आहे, जेणेकरून मी पोटनिवडणूक लढवू शकणार नाही, असे लटके यांनी याचिकेत म्हटले आहे. राजीनामा स्वीकारण्याचे व तसे पत्र जारी करण्याचे आदेश महापालिकेला द्यावेत तसेच पोटनिवडणूक लढविण्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती लटके यांनी न्यायालयाला केली आहे.
पक्षाचा ‘प्लॅन बी’ तयारएखाद्या कर्मचाऱ्याने राजीनामा दिल्यानंतर ३० दिवसांचा आयुक्तांकडे कालावधी असतो. मात्र, हा कालावधी कमी करण्याचा पालिका आयुक्तांना अधिकार आहे. याशिवाय संबंधित कर्मचाऱ्याने एक महिन्याचे वेतन कोषागारात भरले तर एक महिन्याची मुदतही शिथिल करता येते. राजीनामा स्वीकारायचा नसेल तर आयुक्तांनी तसे लिहून द्यावे, अशी मागणी माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केली. आमचा ‘प्लॅन बी’ तयार आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे त्यावर निर्णय घेतील, असेही ते म्हणाले.
भाजप लढणार; पटेलांना उमेदवारीअंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात भाजपच पोटनिवडणूक लढेल आणि गेल्यावेळी क्रमांक दोनवर राहिलेले मुरजी पटेल हेच उमेदवार असतील, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करतील आणि एक-दोन दिवसात पटेल हे उमेदवारी अर्ज भरतील, असे सूत्रांनी सांगितले.
लढवेन तर ‘मशाल’वरचमाझे पती दिवंगत आमदार रमेश लटके हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ होते. आमच्या कुटुंबाची निष्ठा ठाकरेंवरच आहे. त्यामुळे निवडणूक लढवेन तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या मशाल या चिन्हावरच. - ऋतुजा लटके