ड्रग्ज तस्करांकडून एमडीसह गांजा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:06 AM2021-04-19T04:06:32+5:302021-04-19T04:06:32+5:30
तिघांना अटक; एनसीबीचा दोन ठिकाणी छापा लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : अमली पदार्थ नियंत्रण कक्षाने (एनसीबी) दोन विविध ...
तिघांना अटक; एनसीबीचा दोन ठिकाणी छापा
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अमली पदार्थ नियंत्रण कक्षाने (एनसीबी) दोन विविध ठिकाणी छापे टाकून तीन ड्रग्ज तस्करांना अटक केली. त्यांच्याकडून रोख २० लाखांसह माेठ्या प्रमाणावर एमडी व गांजा जप्त केला. सरफराज कुरेशी उर्फ पपी, सन्नी परदेशी व अजय नायर अशी अटक आराेपींची नावे आहेत. कुरेशीला आग्रीपाड्यातून, तर अन्य दोघांना बदलापूर येथून अटक करण्यात आल्याचे एनसीबीने सांगितले.
खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री एनसीबीच्या पथकाने आग्रीपाड्यातून सरफराजला अटक केली. त्याच्या घरातून १६५ ग्रॅम एमडी व २ लाख १५ हजारांची रोकड जप्त केली. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार नागपाडा येथील त्याचा साथीदार समीर सुलेमान शर्मा याच्या घरी छापा टाकला. तेथून ५४ ग्रॅम एमडी आणि १७ लाख९० हजारांची रोकड जप्त केली. समीर मात्र घरातून पसार झाला होता. सरफराज याच्यावर मुंबई पोलिसांकडून गुन्हे दाखल आहेत.
दुसरी कारवाई ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे करण्यात आली. सन्नी परदेशी व अजय नायर यांना अटक करून ४३ किलो गांजा जप्त करण्यात आला. त्यांनी तो कुणाल कडू नावाच्या व्यक्तीकडून घेतला होता. हा गांजा ओडिशा राज्यातून आयात करण्यात आला असून मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्यात येत असल्याचे एनसीबीने सांगितले.